बेळगाव : हिंदवाडी येथील पुरातन श्री घुमटमाळ मारुती मंदिर ट्रस्ट कमिटीची बैठक मावळते अध्यक्ष चंद्रकांत बांडगी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत आगामी वर्षासाठी कुलदीप भेकणे यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
याचबरोबर उपाध्यक्षपदी प्रकाश फल्लोद-माहेश्वरी तर सचिवपदी अनंत लाड यांचीही निवड जाहीर करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष कुलदीप भेकणे हे उद्योजक असून सामाजिक कार्यात सक्रिय सहभागासाठी ओळखले जातात. मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत आणि वाटचालीत भेकणे कुटुंबाचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे.
उपाध्यक्ष प्रकाश माहेश्वरी हे पॉलिस्टर यार्न ट्रेडिंग क्षेत्रातील व्यावसायिक असून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तसेच ते आरएसएसचे कार्यकर्ते म्हणूनही परिचित आहेत. सचिव अनंत लाड हे मंदिराचे माजी अध्यक्ष असून सार्वजनिक वाचनालय, पायोनियर अर्बन बँक, बेळगाव जायंट्स, आधार सोसायटी आणि आनंद अॅडव्हर्टायझिंग अशा विविध संस्थांशी त्यांचा संबंध आहे.
बैठकीत मावळत्या कार्यकारिणीला निरोप देताना आणि नव्या कार्यकारिणीचे स्वागत करताना रघुनाथ बांडगी, सुनील चौगुले आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी संभाजी चव्हाण, गोपाळराव बिरजे, हिरालाल पटेल, सुनील सरनोबत, बाळू किल्लेकर आदी सदस्य उपस्थित होते.
