खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठपुराव्याला यश

खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठपुराव्याला यश

केसरेकर कुटुंबीयांसाठी वरिष्ठ विधिज्ञांची नियुक्ती; नुकसानभरपाईसाठी मोफत कायदेशीर मदत

सांगली, ता. ४ : कुपवाड (जि. सांगली) येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या सौ. मनीषा केसरेकर आणि श्री. मोहन नागप्पा केसरेकर यांच्या कुटुंबीयांना पीडित नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कुटुंबीयांना मोफत कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी वरिष्ठ विधिज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे.

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने २० ऑगस्ट रोजी केलेल्या मागणीची दखल घेत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगलीने वरिष्ठ विधिज्ञ जे. व्ही. नवले यांची नियुक्ती केली आहे. नवले हे केसरेकर कुटुंबीयांना पीडित नुकसानभरपाई मिळवून देण्याच्या प्रक्रियेत आवश्यक कायदेशीर मार्गदर्शन करणार असून मोफत कायदेशीर सहाय्यही उपलब्ध करून देणार आहेत.

यासंदर्भातील पत्र जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी ३ सप्टेंबर रोजी जारी केले. नियुक्त विधिज्ञांशी संपर्क साधून आवश्यक माहिती व कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन संबंधित वारसांना करण्यात आले आहे.

या कार्यवाहीची माहिती महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनाही देण्यात आली आहे. तसेच खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आणि पत्राद्वारेही याबाबत कळविण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे केसरेकर कुटुंबीयांना न्याय मिळविण्याच्या लढ्यात आवश्यक कायदेशीर आधार मिळणार असून पीडित नुकसानभरपाई मिळविण्याच्या प्रक्रियेलाही गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मिळालेले हे महत्त्वाचे यश मानले जात आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 − 7 =

error: Content is protected !!