चंद्रशेखर गायकवाड यांच्या सामाजिक, उपरोधिक आणि भावस्पर्शी कवितांना उत्स्फूर्त दाद
बेळगाव, दि. २९ : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने आणि शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने आयोजित ज्येष्ठ कवी चंद्रशेखर गायकवाड यांच्या ‘कळा या लागल्या जीवा’ या काव्यवाचन कार्यक्रमाला साहित्यप्रेमी, कवी-कवयित्री आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सरस्वती वाचनालयाच्या माई ठाकूर सभागृहात हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शब्दगंध कवी मंडळ संघाचे सचिव सुधाकर गावडे होते. प्रारंभी त्यांनी प्रास्ताविक करून ज्येष्ठ कवी चंद्रशेखर गायकवाड यांचा सत्कार केला. व्यासपीठावर कवी गुरुनाथ किरमटे उपस्थित होते.
यावेळी चंद्रशेखर गायकवाड यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत ‘सार्थक’, ‘अशोकचक’, ‘काळची गरज’, ‘अळीचा अभद्र अजगर’, ‘फिरुनी नवी जन्मेन मी’, ‘ही रात्र मंतरलेली’, ‘नाते तुझे माझे’ आणि ‘भैरवी’ या कविता सादर करून रसिकांना अंतर्मुख केले.
‘सार्थक’ या कवितेतून जन्म, जगणे आणि मृत्यूकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन त्यांनी मांडला. जीवनातील नश्वरतेचे भान आणि अस्तित्वाचा शोध या कवितेतून प्रभावीपणे व्यक्त झाला. ‘अशोकचक’ या कवितेतून समकालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर उपरोधिक शैलीत भाष्य करत त्यांनी सत्तेतील विसंगतींवर प्रहार केला.
‘काळची गरज’ या कवितेतून शिक्षणव्यवस्थेतील बदल, मातृभाषेपासून दूर जाणारी नवी पिढी आणि बदलत्या जीवनशैलीचे वास्तव मांडण्यात आले. ‘अळीचा अभद्र अजगर’ मधून मनातील पूर्वग्रह, संशय आणि द्वेष यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले. ‘फिरुनी नवी जन्मेन मी’ मधून संघर्षानंतर पुन्हा उभे राहण्याची जिद्द आणि आशावाद व्यक्त झाला, तर ‘ही रात्र मंतरलेली’ आणि ‘नाते तुझे माझे’ या कवितांमधून प्रेम, संवेदना आणि मानवी नात्यांतील जिव्हाळा उलगडला. ‘भैरवी’ या कवितेने कार्यक्रमाची भावपूर्ण सांगता झाली.
गायकवाड यांच्या काव्यवाचनाचे वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक वास्तवावर मार्मिक भाष्य, उपरोधाची धार, मानवी नात्यांची हळुवार जाणीव आणि जीवनाकडे पाहण्याची चिंतनशील दृष्टी. त्यांच्या प्रत्येक कवितेला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.
यानिमित्ताने आयोजित खुल्या कवी संमेलनात प्रा. शुभदा खानोलकर, अपर्णा पाटील, प्रा. मनीषा नाडगौडा, रोशनी हूंदरे, नेहा जोशी, भरत गावडे, सीमा कनबरकर, नंदिनी दामले, अशोक सुतार, स्मिता किल्लेकर, गुरुनाथ किरमटे, जितेंद्र रेडेकर, प्रा. स्वरूपा इनामदार, प्रकाश अनवेकर, किरण पाटील, दत्ता घोडके, प्रकाश पाटील, कृष्णा पारवाडकर, सुधाकर गावडे, बसवंत शहापूरकर, मनोहर घडी आदी कवींनी विविध विषयांवरील स्वरचित कविता सादर करून कार्यक्रमाला अधिक रंगत आणली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र रेडेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन नेहा जोशी यांनी केले.
