भारतीय संस्कृतीचे महत्त्व जगाला समजावून सांगण्याची गरज – डॉ. दिलीप पटवर्धन; ३५० साधकांची उपस्थिती
बेळगाव : भारतीय संस्कृतीसारखी उच्च संस्कृती जगात कोठेही नाही. आपल्या भारतीय संस्कृतीचे महत्त्व संपूर्ण जगाला समजावून सांगण्याची गरज आहे. हे महान कार्य जीवनविद्या मिशनचे संस्थापक सद्गुरू वामनराव पै यांनी केले असून, हे कार्य जीवनविद्येच्या साधकांनी पुढे न्यावे, असे प्रतिपादन जीवनविद्या मिशनचे माजी अध्यक्ष आणि नंदादीप हॉस्पिटल समूहाचे डॉ. दिलीप पटवर्धन यांनी केले.
जीवनविद्या मिशनचे संस्थापक सद्गुरू वामनराव पै यांच्या तिथीनुसार येणाऱ्या १०४ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जीवनविद्या मिशनच्या बेळगाव शाखेचे प्रबोधनकार शंकरराव बांदकर यांच्या शाहूनगर येथील निवासस्थानी बलिप्रतिपदेच्या दिवशी, मंगळवारी सायंकाळी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी सुमारे ३५० साधक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संगीत जीवनविद्येच्या हरिपाठाने झाली. उपस्थितांचे स्वागत रवी बांदकर यांनी केले. यावेळी डॉ. दिलीप पटवर्धन यांचा सन्मान शंकरराव बांदकर यांच्या हस्ते करण्यात आला.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून डॉ. पटवर्धन यांनी सद्गुरू वामनराव पै यांचा जीवनपट उलगडून दाखविला. सद्गुरूंनी समाजाला दिलेल्या विचारांचे महत्त्व स्पष्ट करताना ते म्हणाले, सद्गुरूंनी ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’, ‘शरीर साक्षात परमेश्वर’ यांसारखे अनेक क्रांतिकारक सिद्धांत मांडले. या विचारांमुळेच अनेक जण जीवनविद्या मिशनशी जोडले गेले. संपूर्ण जगात शांतता नांदावी आणि भारत देश सर्वार्थाने प्रगतीपथावर जावा, हेच जीवनविद्येचे मूळ सूत्र आहे.
सद्गुरूंनी अत्यंत मोजक्या शब्दांत जीवनातील अनेक महत्त्वाच्या संकल्पनांच्या परिपूर्ण व्याख्या केल्या आहेत. माणसाला पुरेशी संपत्ती म्हणजे नेमके काय, याबाबत सद्गुरूंचा विचार स्पष्ट करताना ते म्हणाले, ‘हाती घेतलेले समाजहितोपयोगी काम प्रामाणिकपणे व कौशल्याने करून जी संपत्ती मिळते, तीच पुरेशी संपत्ती होय.’
जीवनविद्या मिशनने काम, क्रोध, लोभ, मोह आणि मत्सर या मानवी विकारांचेही सखोल विश्लेषण केले आहे. क्रोधाचे रूपांतर सहनशक्ती आणि सहिष्णुतेच्या माध्यमातून प्रेमात झाले पाहिजे. अन्यथा तो संतापाचे रूप धारण करतो. लोभाचे रूपांतर प्रेमात व्हावे, तो हव्यासात बदलता कामा नये. मोहाचे रूपांतर संयम, विरक्ती आणि वैराग्यात झाले पाहिजे. तसेच मत्सराचे रूपांतर द्वेषात न होता आदरभावात झाले पाहिजे. या सकारात्मक परिवर्तनासाठी प्रत्येकाने जीवनविद्येचे विचार आत्मसात करणे आवश्यक आहे, असेही डॉ. पटवर्धन यांनी सांगितले.
कार्यक्रमाला जीवनविद्या मिशनच्या बेळगाव शाखेचे सतीश बेकवाडकर, तानाजी पाटील, दीपक बिरजे यांच्यासह अनेक मान्यवर आणि साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
