देसूरच्या सरकारी आदर्श मराठी शाळेच्या शतक महोत्सवाला उत्साहात प्रारंभ

देसूरच्या सरकारी आदर्श मराठी शाळेच्या शतक महोत्सवाला उत्साहात प्रारंभ

रमाकांत कोंडुस्कर व ज्योती कोंडुस्कर यांच्या हस्ते दिंडी पूजन करून उद्घाटन

बेळगाव : देसूर (ता. जि. बेळगाव) येथील सरकारी आदर्श पूर्ण प्राथमिक मराठी शाळेच्या ऐतिहासिक शतक महोत्सवाला मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. १९२६ ते २०२६ असा शंभर वर्षांचा गौरवशाली शैक्षणिक प्रवास पूर्ण करणाऱ्या या शाळेच्या शतक महोत्सवानिमित्त गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या शतक महोत्सवाचे उद्घाटन मान्यवर रमाकांत कोंडुस्कर आणि त्यांच्या पत्नी ज्योती कोंडुस्कर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी पारंपरिक पद्धतीने दिंडीचे विधिवत पूजन करून महोत्सवाचा मंगलमय शुभारंभ करण्यात आला.

शंभर वर्षांपासून देसूर परिसरातील विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून शिक्षणाची ज्ञानगंगा देणाऱ्या या शाळेच्या ऐतिहासिक वाटचालीचा गौरव करण्यासाठी आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.

या प्रसंगी शाळेचे आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी तसेच देसूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या शतक महोत्सवाच्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळत असून, शाळेच्या शंभर वर्षांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक योगदानाबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

11 + 3 =

error: Content is protected !!