समाजाने जिवंतपणी नाकारले, पण अखेरच्या प्रवासात लाभला माणुसकीचा आधार

समाजाने जिवंतपणी नाकारले, पण अखेरच्या प्रवासात लाभला माणुसकीचा आधार

बेळगाव : शरीरविक्रिकरून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांकडे समाजाचा दृष्टिकोन अनेकदा तिरस्कार, पूर्वग्रह आणि उपेक्षेचा राहिला आहे. अशाच उपेक्षित आयुष्य जगणाऱ्या गणपत गल्लीतील वारंगना राखी यांचे आज पहाटे निधन झाले.

राखी यांच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी बिम्स (सिव्हिल हॉस्पिटल) येथे नेण्यात आला. मात्र, त्यांच्या पार्थिवावर हक्क सांगण्यासाठी किंवा अंतिम दर्शनासाठी कोणतेही नातेवाईक अथवा आप्तेष्ट पुढे आले नाहीत. आयुष्यभर एकटेपणा आणि सामाजिक उपेक्षा सोसलेल्या राखी यांचा शेवटचा प्रवासही एकाकीच होणार, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

मात्र, अशा वेळी समाजातील काही संवेदनशील व्यक्तींनी पुढाकार घेत माणुसकीचे दर्शन घडवले. राखी यांच्या पार्थिवाजवळ कोणीही नसल्याचे समजताच साधना महिला संघाच्या सौ. अन्नपूर्णा, बीआरडीएस संस्थेचे दुंडप्पा अंदानी आणि अनगोळकर फाउंडेशनचे सुरेंद्र अनगोळकर यांनी तातडीने धाव घेतली.

राखी यांच्या अंतिम प्रवासात हक्काची माणसे बनत त्यांनी आवश्यक सर्व सहकार्य केले. “मृत्यूनंतर प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने निरोप मिळायलाच हवा,” या भावनेतून त्यांनी सामाजिक जबाबदारी स्वीकारत त्यांच्या अंत्यविधीची व्यवस्था करण्यासाठी पुढाकार घेतला.

समाजाने जिवंतपणी स्वीकार न केलेल्या एका महिलेच्या शेवटच्या प्रवासात दाखविलेली ही माणुसकी अनेकांना अंतर्मुख करणारी ठरली. प्रत्येक व्यक्तीची ओळख तिच्या व्यवसायाने नव्हे, तर तिच्या माणूसपणाने असते, याची जाणीव या घटनेने पुन्हा एकदा करून दिली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

17 − seven =

error: Content is protected !!