सीमाप्रश्नी सर्वोच्च सह्यांच्या मोहिमेला पुण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; सीमावासीयांचा निर्धार पुन्हा बुलंद

सीमाप्रश्नी सर्वोच्च सह्यांच्या मोहिमेला पुण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; सीमावासीयांचा निर्धार पुन्हा बुलंद

बेळगाव : सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील दाव्याला गती मिळावी, या उद्देशाने बेळगाव मराठी पत्रकार संघ आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सर्वोच्च सह्यांच्या मोहिमेला पुण्यातील सीमावासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पुण्यात आयोजित कार्यक्रमात सीमाप्रश्न, सर्वोच्च न्यायालयातील खटला आणि सीमावासीयांवर होणाऱ्या भाषिक अन्यायाबाबत चर्चा करून सह्यांची मोहीम राबविण्यात आली.

पुणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमात सीमाभागातून वारकऱ्यांसोबत आलेले तसेच नोकरी-व्यवसायानिमित्त पुण्यात स्थायिक झालेल्या मराठी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विश्वनाथ पाखरे यांनी प्रास्ताविक करून मोहिमेचा उद्देश स्पष्ट केला. चन्नेवाडी (ता. खानापूर) येथील रामचंद्र पाटील यांनी सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्याय, मराठीची गळचेपी, कन्नड सक्ती आणि मराठी बांधवांवर दाखल होणाऱ्या कथित खोट्या गुन्ह्यांबाबत माहिती देत, पुण्यातील युवकांनी आपल्या जन्मभूमीच्या प्रश्नासाठी उचललेले पाऊल कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

खानापूर- बेळगाव मित्र मंडळाचे संस्थापक पीटर डिसोझा यांनी अंतर्गत मतभेद विसरून सीमावासीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र सरकारला सातत्याने जाग करण्याचे काम सुरू ठेवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मित्रमंडळाचे अध्यक्ष विजय पाटील यांनी सीमालढ्याला नव्या टप्प्यावर नेण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. सामाजिक माध्यमांवर सीमाप्रश्नाबाबत भूमिका मांडताना कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची युवकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

उद्योजक मारुती वाणी यांनी सीमालढा हा कोणत्याही राज्य किंवा भाषेविरोधातील नसून आपल्या अस्मितेचा लढा असल्याचे सांगत प्रत्येक सीमावासीयाने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.

यावेळी दत्ता भेकणे, संदीप घाडी, केदार शिवणगेकर आणि शिवाजी जळगेकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करत पुण्यातील युवकांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सातेरी पाटील आणि गणपती पाटील यांनी केले. यावेळी सीमाभागातील तसेच पुण्यात स्थायिक असलेले अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

13 − 2 =

error: Content is protected !!