शिवानंद महाविद्यालयात हिंदी दिवसानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन
कागवाड : प्रतिनिधी
कोणत्याही दबावामुळे भाषेचे अस्तित्व नष्ट होत नाही. मात्र, सामान्य माणूस जेव्हा एखाद्या भाषेपासून फारकत घेतो, तेव्हाच त्या भाषेच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो. भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नसून माणसांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. हिंदी भाषेने भारतातील विविध प्रांतांतील लोकांना एकत्र जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे, असे प्रतिपादन प्रा. संतोष सूर्यवंशी यांनी केले.
येथील एसएमएटीच्या शिवानंद महाविद्यालयाच्या हिंदी विभागातर्फे हिंदी दिवसानिमित्त ‘हिंदी भाषा एवं साहित्य’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. तळवार होते. व्यासपीठावर आयक्यूएसी समन्वयक प्रा. बी. डी. दामन्नावर, हिंदी विभागप्रमुख डॉ. अमोल पाटील आणि प्रा. आय. एस. जमादार उपस्थित होते.
यावेळी प्रा. सूर्यवंशी यांनी हिंदी भाषेच्या विकासाचा आढावा घेत संत तुलसीदास यांच्या ‘रामचरितमानस’ या ग्रंथाचे हिंदी भाषेच्या प्रसारातील योगदान स्पष्ट केले. हिंदी साहित्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीमुळे या भाषेचा देशभर मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतही हिंदी भाषेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून, विविध भाषा आणि संस्कृती असलेल्या भारताला परस्परांशी जोडण्यात हिंदीचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाची सुरुवात कु. अनन्या कुलकर्णी हिच्या स्वागतगीताने झाली. मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून व्याख्यानाचे उद्घाटन करण्यात आले. प्रा. आय. एस. जमादार यांनी स्वागत केले, तर डॉ. अमोल पाटील यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
यावेळी प्रा. बी. डी. दामन्नावर यांनी हिंदी भाषेचे महत्त्व विशद केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एस. पी. तळवार यांनी भारताच्या बहुभाषिक स्वरूपाचे महत्त्व सांगितले. प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगतानाच इतर भाषांचाही आदर आणि गौरव केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
हिंदी दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी भाषण आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ओंकार कांबळे यांनी केले, तर सानिया गायकवाड हिने आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग आणि हिंदी विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
