बेळगाव : प्रतिनिधी
बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे प्रतिभावान स्केटर्स देवेन बामणे आणि साईराज मेंडके यांची दक्षिण अमेरिकेतील पॅराग्वे येथे होणाऱ्या जागतिक स्केटिंग स्पर्धेसाठी भारतीय स्केटिंग संघात निवड झाली आहे. या निवडीमुळे बेळगावच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
देवेन बामणे हा केएलएस जीआयटी इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी असून साईराज मेंडके हा आरएलएस महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. भुवनेश्वर (ओडिशा) आणि मोहाली (चंदीगड) येथे झालेल्या निवड चाचण्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत दोघांनीही भारतीय संघात स्थान मिळविले आहे.
गेल्या १२ वर्षांपासून दोघेही स्केटिंगचे प्रशिक्षण घेत असून, जागतिक स्पर्धेतील निवडीसाठी त्यांनी रात्रंदिवस कठोर परिश्रम घेतले आहेत. स्पीड स्लालोम आणि अल्पाइन या प्रकारांमध्ये झालेल्या निवड चाचण्यांमध्ये त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले.
२ ते १८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पॅराग्वे येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेत देवेन आणि साईराज भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर बेळगावचे नाव उज्ज्वल करण्याची संधी या दोन्ही खेळाडूंना मिळाली आहे.
दोन्ही खेळाडूंना स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, मंजुनाथ मंडोळकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गंगणे आणि सोहम हिंडलगेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
तसेच कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनचे सचिव इंदुधर सीताराम, आरएलएस कॉलेजचे प्राचार्य विश्वनाथ कामगोळ, केएलएस जीआयटीचे डॉ. विजय आठवले, दिगंबर कुलकर्णी, डॉ. जॉर्ज रॉड्रिग्ज, बेळगाव जिल्हा स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर, विनोद बामणे, ज्योती बामणे, श्रीकांत मेंडके आणि अर्चना मेंडके यांचे प्रोत्साहन व सहकार्य लाभत आहे.
देवेन आणि साईराज यांच्या या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत असून, जागतिक स्पर्धेतही ते उल्लेखनीय कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
