खानापूर काँग्रेसची जिल्हा परिषद, तालुका पंचायत निवडणुकीसाठी पूर्वतयारी बैठक

खानापूर काँग्रेसची जिल्हा परिषद, तालुका पंचायत निवडणुकीसाठी पूर्वतयारी बैठक

‘कामाला लागा’; इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याच्या डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या सूचना

खानापूर : आगामी जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खानापूर काँग्रेसची पूर्वतयारी बैठक आज रायगड निवासी येथे पार पडली. खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले. तसेच इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत, अशी सूचना केली.

या बैठकीला बेळगाव जिल्हा काँग्रेसचे नूतन अध्यक्ष बसवराज सिग्गावी उपस्थित होते. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ. निंबाळकर यांची त्यांच्याशी भेट झाली नव्हती. त्यामुळे डॉ. निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ब्लॉक काँग्रेसच्या वतीने नूतन जिल्हाध्यक्ष बसवराज सिग्गावी यांचा सत्कार करण्यात आला.

बैठकीत उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांच्या नियोजनाबाबत आपापली मते मांडली. निवडणुकीच्या तयारीसंदर्भात विविध सूचना करण्यात आल्या. तालुका स्तरावर स्क्रीनिंग कमिटी स्थापन करण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांचे अर्ज या समितीसमोर ठेवून त्यानंतर योग्य उमेदवारांची निवड केली जाईल, असे डॉ. निंबाळकर यांनी सांगितले. तालुक्यातील सर्व भागांत उमेदवार उभे करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तालुक्यातील काही व्यक्तींनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली असून, योग्य वेळी त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

महिला आरक्षणाबाबत बोलताना डॉ. निंबाळकर यांनी राजकारणात महिलांचा सहभाग वाढण्याची गरज व्यक्त केली. यंदा मोठ्या प्रमाणावर महिलांना आरक्षण मिळाल्याचे नमूद करत त्यांनी या संधीचा महिलांनी लाभ घ्यावा, असे मत मांडले. महिला अध्यक्ष सावित्री मादार यांनीही महिला आरक्षणाबाबत समाधान व्यक्त केले.

या बैठकीत अॅड. घाडी, मानतेश राऊत, लक्ष्मण भाऊ मादार, रियाझ पटेल, बेनी पिंटो, काशिम हट्टीहोळी, जिल्हाध्यक्ष बसवराज सिग्गावी आणि डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी आपले विचार मांडले.

उद्या खानापूरमध्ये आंदोलन

दरम्यान, निवडणूक आयोगाचे ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात खानापूर काँग्रेसच्या वतीने उद्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. सकाळी ९.३० वाजता खानापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात होणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी सकाळी ९.३० वाजता आंबेडकर पुतळ्याजवळ उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × two =

error: Content is protected !!