हलशी : आषाढी एकादशीचे औचित्य साधत येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर हायस्कूलच्या वतीने गावात भव्य आणि भक्तिमय दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विठ्ठलनामाच्या जयघोषाने, टाळ-मृदुंगाच्या गजराने आणि वारकरी परंपरेच्या दर्शनाने संपूर्ण हलशी गाव भक्तीरसात न्हाऊन निघाले.
दिंडीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वारकरी परंपरेचे सुंदर दर्शन घडवले. मुलांनी पांढरा कुर्ता-धोतर, गांधी टोपी किंवा फेटा परिधान केला होता, तर मुलींनी नऊवारी साडी नेसून कपाळावर बुक्का लावला होता. हातात तुळशीवृंदावन आणि कलश घेऊन सहभागी झालेल्या विद्यार्थिनी तसेच विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या वेशातील बालवारकरी विशेष आकर्षण ठरले.
शाळेच्या प्रांगणात पालखीचे पूजन करून दिंडीला प्रारंभ झाला. ‘ज्ञानबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. टाळ-मृदुंगाच्या तालावर विद्यार्थ्यांनी अभंग गायन, फुगड्या आणि पारंपरिक सादरीकरण करून वातावरण भक्तिमय केले. गावातील मुख्य चौकात सादर करण्यात आलेला शिस्तबद्ध रिंगण सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक जनजागृतीलाही प्राधान्य दिले. ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ‘स्वच्छता पाळा’ आणि ‘प्लास्टिकमुक्त भारत’ अशा संदेशांचे फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश दिला.
दिंडी मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले. महिलांनी पालखीचे पूजन करून वारकरी विद्यार्थ्यांना पेढे व शरबताचे वाटप केले. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या नियोजनातून हा भक्तिमय आणि प्रेरणादायी सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.
