सुळगा (हिं.) येथे उस्ते-सत्तरी गोव्याच्या वारकरी दिंडीचे जल्लोषात स्वागत; स्व. शट्टूप्पा पाटील यांच्या सेवाभावाचा वारसा पाचव्या वर्षीही कायम:

सुळगा (हिं.) येथे उस्ते-सत्तरी गोव्याच्या वारकरी दिंडीचे जल्लोषात स्वागत; स्व. शट्टूप्पा पाटील यांच्या सेवाभावाचा वारसा पाचव्या वर्षीही कायम:

१५३ वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था; दिंडीकडून रोहन पाटील, माधुरी जाधव व सहकाऱ्यांचा सन्मान:

बेळगाव : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे पायी निघालेल्या गोव्यातील उस्ते-सत्तरी (वाळपई) येथील श्रीराम माऊली वारकरी मंडळाच्या दिंडीचे बुधवारी सुळगा (हिं.) येथे ग्रामस्थांनी उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत केले. यावेळी वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली असून, दिवंगत सामाजिक कार्यकर्ते शट्टूप्पा (बाळू) पाटील यांनी सुरू केलेली सेवाभावाची परंपरा त्यांच्या कुटुंबीयांनी सलग पाचव्या वर्षीही कायम ठेवली.

बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील हनुमान मंदिर परिसरात झालेल्या स्वागत सोहळ्यास स्व. शट्टूप्पा पाटील यांचे सुपुत्र रोहन पाटील, समाजसेविका माधुरी जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला. दिंडीचे औक्षण करून सर्व वारकऱ्यांना अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले. पावसाने उघडीप दिल्यामुळे वारकऱ्यांनी मोकळ्या वातावरणात या सेवाभावी उपक्रमाचा आनंद घेतला.

यावेळी वारकरी विद्येश माडकर यांनी सांगितले की, श्रीराम माऊली वारकरी मंडळाची ही पाचवी पायी वारी असून उस्ते येथून खांद्यावर पालखी घेऊन पंढरपूरपर्यंत पायी प्रवास करणे हे या दिंडीचे वैशिष्ट्य आहे. यंदाच्या वारीत १५३ वारकरी सहभागी झाले असून दररोज नामस्मरणावर विशेष भर दिला जात आहे. बारकेलो राणे (बुवा) यांच्या नेतृत्वाखाली, उपप्रमुख सर्वेश राणे, संचालक रामकृष्ण इब्रामपूरकर आणि सचिव मोहन वांतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वारीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सुळगा ग्रामस्थांनी केलेल्या स्वागताबद्दल आणि रोहन पाटील, माधुरी जाधव व सहकाऱ्यांनी राबविलेल्या सेवाभावी उपक्रमाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

प्रास्ताविकात शेखर मनोहर पाटील यांनी स्व. शट्टूप्पा पाटील यांच्या समाजकार्यातील योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेतला. “वारकऱ्यांची सेवा म्हणजेच ईश्वरसेवा” या भावनेतून त्यांनी सुरू केलेली अल्पोपहाराची परंपरा त्यांच्या निधनानंतरही रोहन पाटील, माधुरी जाधव आणि सहकाऱ्यांनी अखंडपणे सुरू ठेवून त्यांच्या सेवाभावाचा वारसा जपल्याचे त्यांनी सांगितले.

माधुरी जाधव यांनी मनोगतात स्व. शट्टूप्पा पाटील यांनी दिलेले सेवाभावाचे संस्कार पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा मानून ही परंपरा भविष्यातही अविरत सुरू राहील, असे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी सुळगा ग्रामस्थांसह भरत पाटील, वीर पाटील, राजश्री कदम, मनीषा देसाई आणि अन्य सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी श्रीराम सेना हिंदुस्थानचे ग्रामीण अध्यक्ष भरत पाटील यांनीही वारकरी परंपरेतील सेवाभावाचे महत्त्व अधोरेखित करत दिंडीच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी दरवर्षीप्रमाणे केलेल्या स्वागत व अल्पोपहार व्यवस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत श्रीराम माऊली वारकरी मंडळाच्या वतीने रोहन पाटील, माधुरी जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी निवृत्त पोलीस उपनिरीक्षक राजश्री कदम, वासंती पाटील, श्वेता खांडेकर, स्मिता पाटील, वीर पाटील, साईनाथ पाटील, माजी सैनिक ऑन. कॅप्टन धनाजी मोरे, परशराम सांगावकर, मोन्नापा पाटील, शिवा पुजारी, दिलीप कोंडुसकोप, रमेश कुडचीकर, योगेश कुडचीकर, ओमकार पाटील, भरत कुडचीकर, गोपाळ कलखांबकर, बाबुराव कोकीतकर, प्रथमेश कोचेरी, नागेश निलजकर, शंकर अष्टेकर, पार्थ खांडेकर, रोहित चौगुले, सूरज चौगुले, रमेश कलखांबकर, खेमानी कलखांबकर, धनंजय मोहिते आदी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 1 =

error: Content is protected !!