हिटणी सरकारी मराठी शाळेतील शिक्षकांच्या बदलीची मागणी; ३ ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाचा इशारा

हिटणी सरकारी मराठी शाळेतील शिक्षकांच्या बदलीची मागणी; ३ ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाचा इशारा

बेळगाव / हुक्केरी : हुक्केरी तालुक्यातील हिटणी येथील सरकारी प्राथमिक मराठी मुलांची शाळा येथील शिक्षकांच्या कथित निष्काळजीपणामुळे शाळेची शैक्षणिक गुणवत्ता घसरली असून विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संबंधित शिक्षकांच्या बदलीची मागणी केली आहे. या मागणीसंदर्भात बीईओ, हुक्केरी यांना निवेदन देण्यात आले असून, मागणीची दखल न घेतल्यास ३ ऑगस्ट २०२६ पासून शाळेसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झालेलेल्या आणि शंभर वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शाळेची आज अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. शिक्षक वेळेवर शाळेत उपस्थित राहत नसल्याने, विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने तसेच शिक्षकांमधील अंतर्गत वादांमुळे शिक्षणावर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यामुळे शाळेची पटसंख्या सातत्याने घटत असून, चालू शैक्षणिक वर्षात दोन वर्ग बंद करण्याची वेळ आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गेल्या दहा वर्षांपासून ग्रामस्थ, पालक आणि सामाजिक कार्यकर्ते या समस्येबाबत सातत्याने पाठपुरावा करत असून, शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनाही याची माहिती असल्याचा दावा करण्यात आला आहे.

निवेदनात सध्या कार्यरत असलेल्या चारही शिक्षकांची बदली करून त्यांच्या जागी कर्तव्यदक्ष व विद्यार्थीहित जपणारे शिक्षक तातडीने नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा ३ ऑगस्ट २०२६ पासून सरकारी प्राथमिक मराठी मुलांची शाळा, हिटणी येथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

या निवेदनाच्या प्रती डीडीपीआय चिक्कोडी, प्रादेशिक आयुक्त बेळगाव, जिल्हाधिकारी, कर्नाटकचे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक, हुक्केरीचे आमदार, खासदार, संकेश्वर पोलिस ठाण्याचे सीपीआय तसेच हिटणी ग्रामपंचायतीचे पीडीओ यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × five =

error: Content is protected !!