‘भावनांचे भोळे पक्षी’ काव्यमैफिलीने बेळगावकर रसिक मंत्रमुग्ध; जितेंद्र रेडेकर यांच्या भावस्पर्शी कवितांना उत्स्फूर्त दाद

‘भावनांचे भोळे पक्षी’ काव्यमैफिलीने बेळगावकर रसिक मंत्रमुग्ध; जितेंद्र रेडेकर यांच्या भावस्पर्शी कवितांना उत्स्फूर्त दाद

शब्दगंध कविमंडळ संघातर्फे ‘कवी समजून घेतांना’ उपक्रमांतर्गत विशेष काव्यवाचन कार्यक्रम

बेधडक बेळगाव वृत्तसेवा | बेळगाव

शब्दगंध कविमंडळ संघ, बेळगाव यांच्यावतीने आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने ‘कवी समजून घेतांना’ या उपक्रमांतर्गत (पुष्प १० वे) ‘भावनांचे भोळे पक्षी’ हा कवी जितेंद्र रेडेकर यांच्या विशेष काव्यवाचनाचा कार्यक्रम शनिवारी (दि. २६) सायंकाळी शहीद भगतसिंग सभागृहात उत्साहात पार पडला. विविध विषयांवरील आशयपूर्ण कविता, प्रभावी सादरीकरण आणि विनोदी शैलीची जोड यामुळे या काव्यमैफिलीने बेळगावकर रसिकांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शब्दगंधचे उपाध्यक्ष बसवंत शहापूरकर यांनी स्वागत व प्रास्ताविक करून संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी संस्थेचे सचिव सुधाकर गावडे व बसवंत शहापूरकर यांच्या हस्ते कवी जितेंद्र रेडेकर यांचा स्मृतिचिन्ह व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

सुमारे पाऊण तास रंगलेल्या या काव्यसफरीत कवी जितेंद्र रेडेकर यांनी आई, वडील, निसर्ग, दुष्काळ, बालपण आणि प्रेम अशा विविध विषयांवरील कविता सादर केल्या. ‘तन मराठी मन मराठी’ या कवितेतून त्यांनी मराठी अस्मितेचा जागर केला. तर ‘आई माझी म्हणते मला’ आणि ‘मागणं एकच आहे देवा, पुन्हा दे रे बालपण’ या कवितांनी मातृप्रेम आणि बालपणीच्या आठवणींना उजाळा देत रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.

शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी ‘पडली ओसाड शेती, मातीची झाली राख’ ही कविता तसेच ‘भावनांचे ही भोळे पक्षी’ या शीर्षकाच्या कवितेने उपस्थितांच्या मनाला भावनिक स्पर्श केला.

दुसरीकडे, ‘रामदेव जवळची पावभाजी पुन्हा एकदा खायची आहे’ या स्थानिक संदर्भ असलेल्या खुसखुशीत कवितेने रसिकांना हसवले. तसेच ‘माझ्या एका फोटोमध्ये माझे डोळे लाल का झाले?’ आणि ‘मी पोरगा लई भारी हाय’ या कवितांमधून हास्याची कारंजी फुलवत कवीने आपल्या सादरीकरणातील वैविध्य दाखवून दिले.

स्थानिक कवींच्या कवितांनी रंगले कवी संमेलन

मुख्य कार्यक्रमापूर्वी आयोजित कवी संमेलनात स्थानिक कवींनी विविध विषयांवर बहारदार काव्यवाचन केले. यामध्ये रेखा गद्रे, स्नेहल बर्डे, अशोक सुतार, अंकिता कदम, अस्मिता आळतेकर, किरण पाटील, भरत गावडे, शिवाजी शिंदे, परशराम खेमणे, सुधाकर गावडे, बसवंत शहापूरकर, गुरुनाथ किरमटे, चंद्रशेखर गायकवाड, कृष्णा पारवाडकर आणि मधु पाटील आदी कवींनी सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर गायकवाड यांनी केले, तर सुधाकर गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या काव्यमैफिलीला शहरातील काव्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भावभावनांचा सुरेख आविष्कार आणि विनोदाची पखरण यामुळे हा कार्यक्रम रसिकांच्या स्मरणात राहणारा ठरला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

6 − three =

error: Content is protected !!