सावगाव तलावात बुडालेल्या व्यक्तीला वाचविण्यासाठी सोशल वर्कर रेस्क्यू टीमचे शर्थीचे प्रयत्न

सावगाव तलावात बुडालेल्या व्यक्तीला वाचविण्यासाठी सोशल वर्कर रेस्क्यू टीमचे शर्थीचे प्रयत्न

अवघ्या १० मिनिटांत घटनास्थळी धाव; सीपीआर देत १०८ रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल, मात्र व्यक्तीचा मृत्यू

बेळगाव : प्रतिनिधी

बेळगावजवळील सावगाव तलावात बुडालेल्या व्यक्तीला वाचविण्यासाठी सोशल वर्कर रेस्क्यू टीमने तातडीने धाव घेत बचावकार्य केले. घटनेची माहिती मिळताच अवघ्या १० मिनिटांत घटनास्थळी पोहोचलेल्या पथकाने पाण्यातून व्यक्तीला बाहेर काढून तातडीने सीपीआर देत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारासाठी रुग्णालयात पोहोचल्यावर संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास सावगाव तलावात एक व्यक्ती बुडाल्याची माहिती सोशल वर्कर रेस्क्यू टीमला मिळाली. घटनेच्या सुमारे पाच मिनिटांपूर्वीच संबंधित व्यक्ती तलावात बुडाल्याचे सांगण्यात आले. माहिती मिळताच अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हूळी, शशिकांत आंबेवाडकर आणि प्रथमेश साळुंखे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी पोहोचल्यानंतर पथकाने तलावातून संबंधित व्यक्तीला बाहेर काढले. त्यानंतर वेळ न दवडता घटनास्थळीच सीपीआर (कार्डिओपल्मनरी रिससिटेशन) देण्यास सुरुवात केली. पुढील उपचारांसाठी १०८ आपत्कालीन रुग्णवाहिकेतून व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयात नेत असतानाही पथकाकडून सीपीआर देण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर संबंधित व्यक्तीला मृत घोषित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

या आपत्कालीन प्रसंगी सोशल वर्कर रेस्क्यू टीमने दाखविलेली तत्परता, धाडस आणि सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद ठरली आहे. संकटाच्या वेळी तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत आहे.

आपत्कालीन मदतीसाठी संपर्क : सोशल वर्कर रेस्क्यू टीम — +91 8951047677

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eight + thirteen =

error: Content is protected !!