बेळगाव : पावसाळा जवळ आल्याने सर्वत्र वृक्षारोपणाची तयारी सुरू झाली आहे. रस्त्यांच्या कडेला वृक्ष लागवड करणे शक्य असते, मात्र डोंगर-दऱ्या, उंच शिखरे आणि दुर्गम भागांमध्ये वृक्षारोपण करणे कठीण ठरते. याच विचारातून जायंटस् गृप ऑफ बेळगांव मेनतर्फे सीडबॉल तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत गार्डन माती व किटकनाशक पावडर मिसळून मातीचे गोळे तयार केले जातात. त्यामध्ये फणस, आंबा यांसारख्या फळझाडांची बियाणे रोवून गोलाकार सीडबॉल बनवले जातात. हे सीडबॉल महिनाभर सुकवून ठेवले जातात. त्यानंतर मोठा पाऊस झाल्यावर डोंगराळ भाग, दऱ्या व उंच शिखरांवर हे सीडबॉल फेकले जातात. मातीचे गोळे पावसामुळे विरघळल्यानंतर त्यातील बियाणे सहज अंकुरतात आणि पुढे त्याचे सुंदर वृक्षांमध्ये रूपांतर होते.
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमासाठी जायंटस् गृप ऑफ बेळगांव मेनचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे, फेडरेशन ग्रुप एक्सटेंशन ऑफिसर शिवकुमार हिरेमठ, ईश्वर पाटील, आनंद कुलकर्णी, आकाश लाटूकर आदी उपस्थित होते.
