बेळगाव : ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या सातव्या अग्निवीर बॅचचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आज मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे पारंपरिक लष्करी परंपरेनुसार भव्य अटेस्टेशन परेड आयोजित करण्यात आली. 24 आठवड्यांचे कठोर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या 765 अग्निवीरांना यावेळी औपचारिकरित्या सैन्यात सामावून घेण्यात आले.
या परेडचा आढावा ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय, कमांडंट, मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर यांनी घेतला. त्यांनी अग्निवीरांच्या शिस्तबद्ध संचलनाचे आणि उत्कृष्ट ड्रिलचे कौतुक केले. परेडचे नेतृत्व अग्निवीर संकेत सिंह यांनी केले तर मेजर गजानन पाटील हे परेड अॅडज्युटंट होते.
राष्ट्रीय ध्वज, रेजिमेंटल ध्वज आणि धार्मिक ग्रंथांच्या साक्षीने अग्निवीरांनी ‘ओथ ऑफ अफर्मेशन’ घेतली. या सोहळ्यास अग्निवीरांचे पालक, सेवेत असलेले व निवृत्त सैनिक, बेळगावातील मान्यवर, NCC कॅडेट्स तसेच विविध शाळांतील विद्यार्थी उपस्थित होते.
नवीन अग्निवीरांना संबोधित करताना ब्रिगेडियर उपाध्याय यांनी मराठा लाइट इन्फंट्रीच्या गौरवशाली परंपरेची आठवण करून देत सैनिकांच्या जीवनातील शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व अधोरेखित केले. रेजिमेंटल सेंटरमध्ये दिलेले प्रशिक्षण भविष्यातील जबाबदाऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रशिक्षणातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अग्निवीरांचा यावेळी पदक देऊन गौरव करण्यात आला. ‘नाईक यशवंत घाडगे व्हिक्टोरिया क्रॉस मेडल’ हा सर्वोत्कृष्ट अग्निवीर पुरस्कार अग्निवीर घोलप आदर्श यांना प्रदान करण्यात आला.
परेडचा समारोप शौर्य वॉर मेमोरियल येथे पुष्पचक्र अर्पण करून करण्यात आला. रेजिमेंटच्या शूर जवानांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच देशसेवेसाठी आपल्या पाल्यांना प्रेरित करणाऱ्या पालकांचा ‘गौरव पदक’ देऊन सत्कार करण्यात आला.
