बेळगाव स्कूटर आणि मोटरसायकल मेकॅनिक्स वेल्फेअर असोसिएशनचा उपक्रम; गणेश दड्डीकर यांचा पुढाकार
बेळगाव : गणेशोत्सवासाठी बेळगाव शहरात येणाऱ्या गणेशभक्तांची दुचाकी अचानक नादुरुस्त झाल्यास त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी बेळगाव स्कूटर आणि मोटरसायकल मेकॅनिक्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने १९ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विनामूल्य दुचाकी दुरुस्ती सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
गणेशोत्सवातील आकर्षक देखावे पाहण्यासाठी बेळगाव शहरासह ग्रामीण भागातून तसेच महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक शहरात येतात. विशेषतः रात्रीच्या वेळी दुचाकी बंद पडल्यास महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबासह आलेल्या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ही बाब लक्षात घेऊन असोसिएशनने हा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे सचिव गणेश दड्डीकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या पुढाकाराने मोटार मेकॅनिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची व सदस्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीला अध्यक्ष विजयकुमार निंबरगीकर, उपाध्यक्ष राजू रेडेकर, सेक्रेटरी मारुती गुरव, खजिनदार महेश काकतीकर, संचालक विजय शिंदे, गिरीश नाईक (पिल्लू मिस्त्री) यांच्यासह ४० हून अधिक मेकॅनिक उपस्थित होते.
रात्री ९ ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत सेवा
गणेशोत्सवाच्या शेवटच्या सहा दिवसांत दररोज रात्री ९ ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत विनामूल्य दुचाकी दुरुस्ती सेवा दिली जाणार आहे. रात्री १ नंतरही गरज भासल्यास संबंधित मेकॅनिकशी संपर्क साधून मदत घेता येणार आहे.
टायर पंक्चर, स्पार्क प्लग, ट्यूब खराब होणे, ऑईल बदलणे, गिअर व ब्रेक वायर, स्टार्टर तसेच इतर किरकोळ तांत्रिक समस्या कोणतेही सेवा शुल्क न घेता दुरुस्त केल्या जाणार आहेत. नवीन सुटे भाग आवश्यक असल्यास ते ‘No Loss – No Profit’ तत्त्वावर उपलब्ध करून दिले जातील.
वाहनाची कागदपत्रे आवश्यक
सेवेचा गैरवापर किंवा अनुचित प्रकार टाळण्यासाठी दुचाकी मालकाने RC कार्ड/वाहनाची कागदपत्रे तसेच आधार कार्ड दाखवणे आवश्यक राहणार आहे.
तसेच मद्य किंवा इतर व्यसनांच्या प्रभावाखाली वाहन चालवत आलेल्या व्यक्तींना ही सेवा दिली जाणार नाही. गणेशोत्सव भक्ती, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा उत्सव असल्याने व्यसनमुक्त गणेशोत्सवाचा संदेश देण्याचा उद्देश या नियमामागे आहे.
४० हून अधिक मेकॅनिकांचा सहभाग
या उपक्रमात ४० हून अधिक मेकॅनिक स्वेच्छेने सहभागी झाले असून त्यांचे ४ ते ५ विभागांमध्ये नियोजन करण्यात आले आहे. संबंधित मेकॅनिक आणि विभागांची माहिती स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.
इंजिनमध्ये मोठा बिघाड झाल्यास किंवा दुरुस्तीसाठी अधिक वेळ लागणार असल्यास वाहन सुरक्षितपणे ठेवून पुढील दिवशी दुरुस्ती करून देण्यात येणार आहे. तसेच सेवा देताना महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिले जाणार आहे.
शिवजयंती उत्सव २०२६ दरम्यानही प्रायोगिक तत्त्वावर अशाच प्रकारची सेवा देण्यात आली होती. धर्मवीर संभाजी चौक येथे मिरवणुकीदरम्यान मेकॅनिक उपस्थित होते आणि या उपक्रमांतर्गत २५० हून अधिक दुचाकींची विनामूल्य दुरुस्ती करण्यात आली होती. मिळालेल्या प्रतिसादानंतर यंदा गणेशोत्सवातही हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
गणेशोत्सव काळात बेळगावमध्ये येणाऱ्या भाविकांना अडचणीच्या वेळी तातडीची मदत मिळावी आणि त्यांचा प्रवास सुरक्षित व सुलभ व्हावा, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. असोसिएशनचे पदाधिकारी, सहभागी मेकॅनिक आणि पुढाकार घेणारे गणेश दड्डीकर यांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
Available next action:
