प्रेम सुतार, पृथ्वी सुतार, प्रथमेश पाटील आणि अपेक्षा पुजारी यांचा गौरव; 145 कराटेपटूंनी दिली बेल्ट परीक्षेला उपस्थिती:
बेळगाव : इंडियन कराटे क्लब आणि बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेच्या वतीने 12 जुलै 2026 रोजी मच्छे येथील सप्तपदी मंगल कार्यालयात कराटे कलर बेल्ट परीक्षा तसेच ब्लॅक बेल्ट प्रदान समारंभ उत्साहात पार पडला. या परीक्षेत एकूण 145 कराटेपटूंनी सहभाग नोंदविला.
या समारंभात प्रेम सुतार, पृथ्वी सुतार, प्रथमेश पाटील आणि अपेक्षा पुजारी या चार विद्यार्थ्यांना त्यांच्या कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल ब्लॅक बेल्ट प्रदान करून गौरविण्यात आले.
हे चारही विद्यार्थी गेल्या नऊ वर्षांपासून मच्छे शाखेत नियमित कराटे प्रशिक्षण घेत असून त्यांनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत अनेक पदके पटकावली आहेत. त्यांच्या या यशामागे कराटे प्रशिक्षक निलेश गुरखा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पद्मराज पाटील (व्यवस्थापकीय संचालक, आदिवीर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल), सौ. माधुरी जाधव (काँग्रेस साऊथ लीडर) तसेच इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेचे अध्यक्ष कराटे मास्टर गजेंद्र काकतीकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट, प्रमाणपत्रे आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांचाही शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत कराटेमुळे शिस्त, आत्मविश्वास, स्वसंरक्षणाची भावना आणि व्यक्तिमत्त्व विकास घडतो, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इंडियन कराटे क्लबच्या लेडी चीफ इन्स्ट्रक्टर हेमलता ग. काकतीकर तसेच प्रशिक्षक प्रभाकर किल्लेकर, परशुराम काकती, विजय सुतार, हरीष सोनार, रतिक लाड आणि किरण गडकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन लक्षिता जांगिड यांनी केले.
