बेळगाव : प्रतिनिधी
डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर युवकांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासाठी पुणे येथील क्विकहिल फौंडेशन यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘सायबर शिक्षा फॉर सुरक्षा’ या उपक्रमासाठी द. म. शि. मंडळाच्या कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन येथील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थी शैक्षणिक संस्था आणि समाजामध्ये सायबर सुरक्षितता, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव तसेच डिजिटल शिस्त याविषयी जनजागृती करणारे विविध उपक्रम राबविणार आहेत. सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करून सुरक्षित डिजिटल वातावरण घडविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या उपक्रमासाठी अर्पिता जाधव, यश कलकुंद्रीकर, वनिता मोदगेकर आणि श्रीनाथ कांबळे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य आनंद पाटील तसेच शिक्षक समन्वयक वर्षा उचगावकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
क्विकहिल फौंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर आणि सहसंचालक अजय शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालय परिसरात त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
