बसवण गल्लीतील वृद्ध दाम्पत्याला रुग्णालय गाठण्यासाठी कसरत; प्रशासनाने तातडीने मार्ग मोकळा करण्याची मागणी

बसवण गल्लीतील वृद्ध दाम्पत्याला रुग्णालय गाठण्यासाठी कसरत; प्रशासनाने तातडीने मार्ग मोकळा करण्याची मागणी

बेळगाव : बसवण गल्लीच्या मागील बाजूस असलेल्या अरुंद बोळात राहणाऱ्या ७२ वर्षीय वृद्धाला नियमित डायलिसिससाठी रुग्णालयात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अरुंद रस्ता, अस्ताव्यस्त पार्किंग आणि वाहनांची वर्दळ यामुळे रुग्णवाहिका किंवा ऑटो रिक्षा घरापर्यंत पोहोचत नसल्याने वृद्ध दाम्पत्याच्या अडचणीत भर पडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वृद्धाचे नाव जगदीश असून ते गंभीर मधुमेहाने त्रस्त आहेत. त्यांच्या पायावर गँगरीन झाल्याने पाय कापावा लागला आहे. त्यांना नियमित डायलिसिस उपचारासाठी दर तीन-चार दिवसांनी रुग्णालयात जावे लागते. मात्र घरापर्यंत वाहन पोहोचण्यास मार्ग नसल्याने त्यांना व्हीलचेअरवरून अरुंद बोळ पार करून मुख्य रस्त्यापर्यंत यावे लागते. त्यानंतर ऑटो रिक्षाने रुग्णालय गाठावे लागते.

ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हूळी, शशिकांत अंबेवाडकर, शुभम हूळी, मायकेल पिंटो आणि गौतम श्रॉफ यांच्या सोशल वर्कर रेस्क्यू टीमने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

स्थानिकांकडून तसेच संबंधित प्रशासनाकडे या मार्गातील अडथळे आणि अनियंत्रित दुचाकी पार्किंगबाबत यापूर्वी ५ ते ८ वेळा तक्रारी व विनंत्या करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने वृद्ध रुग्णाला प्रत्येक रुग्णालयाच्या फेरीवेळी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

नियमित डायलिसिससारख्या अत्यावश्यक उपचारासाठी जाणाऱ्या या वृद्धाला रुग्णवाहिका किंवा इतर आपत्कालीन वाहन थेट घरापर्यंत पोहोचणे शक्य नसणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी तातडीने या मार्गाची पाहणी करून अनधिकृत पार्किंग व इतर अडथळे हटवावेत आणि वृद्ध दाम्पत्याला वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध होईल, असा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी सोशल वर्कर टीमने केली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

16 − 4 =

error: Content is protected !!