JOC व आर्किटेक्चर डिप्लोमा धारकांचे परवाने नूतनीकरण करण्याची मागणी

JOC व आर्किटेक्चर डिप्लोमा धारकांचे परवाने नूतनीकरण करण्याची मागणी

बेळगाव : सुमारे ४०० हून अधिक JOC (Job Oriented Pre-University Diploma) व आर्किटेक्चर डिप्लोमा धारकांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यात यावे, तसेच निर्माण-२ (Nirman-2) साइटवर त्यांना परवाना नूतनीकरणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी माजी नगरसेवक व JOC डिप्लोमा धारक विनायक गोपाळ गुंजटकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

यासंदर्भात १८ ऑगस्ट २०२६ रोजी आयुक्तांना निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार, सन १९८० पासून बेळगाव शहर महापालिकेकडून JOC डिप्लोमा व आर्किटेक्चर डिप्लोमा धारकांना वेळोवेळी परवाने देण्यात व त्यांचे नूतनीकरण करण्यात येत होते. मात्र, अलीकडच्या काळात JOC डिप्लोमा धारकांच्या परवान्यांचे नूतनीकरण थांबविण्यात आल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सरकारने गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी JOC अभ्यासक्रम सुरू केला असून, या अभ्यासक्रमातून शिक्षण घेतलेल्या अनेकांनी बांधकाम व संबंधित क्षेत्रात काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविला आहे. मात्र परवान्यांचे नूतनीकरण न झाल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या सुमारे ४०० हून अधिक धारकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, यापूर्वी सिटी इंजिनिअर व आयुक्तांकडून परवान्यांचे नूतनीकरण केले जात होते. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर ULMS प्रणालीमध्ये JOC धारकांच्या परवान्यांच्या नूतनीकरणासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे निर्माण-२ साइट उघडून त्यामध्ये JOC डिप्लोमा धारकांनाही परवाना नूतनीकरणाची सुविधा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

गेल्या सहा महिन्यांत ULMS प्रणालीमध्ये केवळ एका प्लॅनला मंजुरी मिळाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले असून, यामुळे सरकारच्या महसुलाचेही नुकसान होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या मागणीसंदर्भात यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा निवेदने सादर करण्यात आली आहेत. मात्र अद्याप कोणतेही ठोस उत्तर मिळाले नसल्याने महापालिका प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन JOC व आर्किटेक्चर डिप्लोमा धारकांचे परवाने तातडीने नूतनीकरण करावेत आणि निर्माण-२ साइट सुरू करावी, अशी मागणी विनायक गुंजटकर यांनी केली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

10 + fourteen =

error: Content is protected !!