कवी कालिदास दिनानिमित्त डॉ. उमेश कळेकर यांच्या कवितांचा विशेष कार्यक्रम

कवी कालिदास दिनानिमित्त डॉ. उमेश कळेकर यांच्या कवितांचा विशेष कार्यक्रम

बेळगाव, दि. 11 जुलै : सीमाभागात मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या शब्दगंध कवी मंडळ संघाच्या वतीने कवी कालिदास दिनानिमित्त “कवितेचे मर्म, वर्म आणि धर्म” या विषयावर विशेष काव्यकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवी, साहित्यिक, व्याख्याते आणि मार्गदर्शक डॉ. उमेश कळेकर हे स्वतःच्या निवडक कवितांचे सादरीकरण करणार आहेत. तसेच त्या कवितांमागील आशय, काव्यदृष्टी, सर्जनप्रक्रिया आणि कवितेचा जीवनाशी असलेला संबंध यावर ते सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे काव्यरसिकांना एक वेगळा आणि प्रेरणादायी साहित्यिक अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

हा कार्यक्रम रविवार, दि. 12 जुलै 2026 रोजी सायंकाळी 4.30 वाजता शहीद भगतसिंग सभागृह, गिरीश कॉम्प्लेक्स, रामदेव गल्ली, बेळगाव येथे होणार आहे.

डॉ. उमेश कळेकर यांचा परिचय

डॉ. उमेश दत्त कळेकर हे सुप्रसिद्ध कवी, साहित्यिक, व्याख्याते आणि मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात. वैद्यकीय सेवा, साहित्य, संगीत आणि भारतीय संस्कृती या विविध क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या ‘फिनिक्स’ या कवितासंग्रहाला स्व. शांता शेळके पुरस्काराने गौरविण्यात आले असून, विविध साहित्य संमेलनांमध्ये त्यांनी निमंत्रित कवी तसेच अध्यक्ष म्हणून सहभाग नोंदविला आहे. त्यांच्या प्रभावी काव्यवाचन, व्याख्यानशैली आणि साहित्यसेवेने त्यांनी मराठी साहित्यविश्वात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.

या साहित्यिक कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी मराठी रसिक, कवी, साहित्यिक, विद्यार्थी तसेच साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शब्दगंध कवी मंडळ संघाचे सचिव सुधाकर गावडे यांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen − 11 =

error: Content is protected !!