बस्तवाड (ता. हुक्केरी), 10 जुलै : 17 व्या कै. सुवर्णाताई आर. मोदगेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त मराठा मंडळ संचलित बस्तवाड हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्य वितरणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी ग्रामपंचायत सदस्य श्री विठ्ठल भावकाण्णा पाटील होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या स्वागतगीताने झाली. त्यानंतर कै. सुवर्णाताई रामचंद्रराव मोदगेकर यांच्या प्रतिमेचे पूजन त्यांचे चिरंजीव श्री किरण मोदगेकर आणि श्री रमेश मोदगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय खांडेकर यांनी केले. त्यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. आपल्या मनोगतात त्यांनी माजी जिल्हा पंचायत सदस्य तसेच मराठा मंडळ स्वस्त समितीचे उपाध्यक्ष मा. श्री रामचंद्रराव मोदगेकर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला. 1996 पासून आजपर्यंत त्यांनी बस्तवाड हायस्कूलशी जपलेले ऋणानुबंध आणि दरवर्षी विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याची परंपरा ही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी श्री रमेश मोदगेकर, श्री निंगाप्पा चौगुले, एसडीएमसी अध्यक्ष श्री शिवाजीराव काकतकर, ग्रामपंचायत सदस्य श्री रामा मंगेश काकतकर तसेच अध्यक्ष श्री विठ्ठल भावकाण्णा पाटील यांनी कै. सुवर्णाताई मोदगेकर यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांचे समाजकार्य आणि शिक्षणाविषयीची तळमळ अधोरेखित केली.
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक आणि शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री परशराम लोहार, सौ. सायली गुरव, सौ. मुक्ता पाटील आणि श्री प्रमोद पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना उपाहार म्हणून शिरा व उपीट देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भावकाण्णा पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री परशराम लोहार यांनी केले.
