बेळगाव : राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त बेळगावातील बापट गल्ली परिसरातील ज्येष्ठ व सर्वपरिचित वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सुरेश रायकर यांचा श्री कालिकादेवी युवक मंडळातर्फे शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. रायकर यांनी अनेक वर्षांपासून समाजाला दिलेल्या समर्पित व सेवाभावी वैद्यकीय कार्याचा गौरव करण्यात आला. विशेषतः कोरोना महामारीच्या कठीण काळात त्यांनी रुग्णांना दिलेल्या निस्वार्थ आणि अहोरात्र वैद्यकीय सेवेचा उपस्थितांनी आवर्जून उल्लेख केला.
गोरगरीब तसेच ग्रामीण भागातील रुग्णांसाठी डॉ. रायकर हे खऱ्या अर्थाने देवमाणूस ठरले असून, उत्कृष्ट वैद्यकीय कौशल्यासह रुग्णांप्रती असलेली त्यांची आत्मीयता आणि सेवाभाव यामुळे त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. बापट गल्लीसारख्या परिसरात अशा सेवाभावी डॉक्टरांची सेवा लाभत असल्याचा अभिमान असल्याचे महेश पावले यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
या सत्कार समारंभास श्री कालिकादेवी युवक मंडळाचे सुनील केसरकर, अंकुश केसरकर, अभी निलजकर, भाऊ किल्लेकर, अतुल केसरकर, महेश पावले, धनंजय कणबरकर यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक, रुग्ण आणि मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर दिनाच्या निमित्ताने झालेल्या या सत्कारामुळे डॉ. सुरेश रायकर यांच्या समाजसेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
