बेळगाव : दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिरात सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी (दि. २९ जून) गाऱ्हाणे घालण्याचा धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. समाजातील सर्व बांधव, बळीराजा, शेती, पाऊस आणि समस्त जनतेच्या सुख-समृद्धीसाठी यावेळी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
यावेळी बेळगाव देवस्थान पंच मंडळाचे अध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील यांनी समस्त मराठा समाजाच्या वतीने कपिलेश्वराचे गाऱ्हाणे घालत राज्यात आणि देशात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी, शेतकरी सुखी व सुरक्षित राहावा, वेळेवर पाऊस पडून शेती बहरावी आणि सर्व समाज आनंदी व समाधानी जीवन जगावा, अशी प्रार्थना केली.
या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते मालोजीराव आष्टेकर यांच्यासह सकल मराठा समाजाचे समन्वयक किरण जाधव, सागर पाटील, गुणवंत पाटील, महादेव चौगुले, कपिल भोसले, शरद पाटील, प्रकाश काळकुंद्रेकर, सुधाकर चाळके, शिवाजी हंगीरगेकर, शिवराज पाटील, विनायक हूलजी, राजन जाधव, पार्थ पाटील, गजानन मिसाळे, महेश लघाडे तसेच कपिलेश्वर मंदिर ट्रस्टचे सर्व सदस्य आणि मराठा समाजाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बेळगाव शहर व परिसरातील नागरिकांनीही या धार्मिक आणि सामाजिक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सामूहिक प्रार्थना, भक्तिमय वातावरण आणि समाजाच्या एकोप्याचे दर्शन घडविणाऱ्या या कार्यक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले.
