बाराजण धबधबा दुर्घटनेप्रकरणी बेळगावच्या पाच पर्यटकांवर गुन्हा; अभयारण्यात प्रवेशावर पूर्ण बंदी

बाराजण धबधबा दुर्घटनेप्रकरणी बेळगावच्या पाच पर्यटकांवर गुन्हा; अभयारण्यात प्रवेशावर पूर्ण बंदी

बेळगाव/वाळपई : गोव्यातील म्हादई अभयारण्यातील बाराजण धबधब्यावर झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेनंतर गोवा वनविभागाने कठोर पाऊल उचलत बेळगावच्या पाच पर्यटकांवर वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या दुर्घटनेत बेळगावातील अदित्य दीपककुमार सत्पती (वय २०) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.

रविवार (२८ जून) रोजी बेळगावातील सहा तरुणांनी अभयारण्य व बफर झोनमध्ये प्रवेशबंदी असतानाही बेकायदेशीरपणे जंगलात प्रवेश करून बाराजण धबधब्यावर पर्यटनासाठी गेले होते. मौजमस्ती करताना अदित्य पाण्यात बुडाला. सोमवारी त्याचा मृतदेह सापडल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली.

वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अभयारण्यात प्रवेशबंदीचे फलक लावण्यात आलेले असतानाही पर्यटक नियमांचे उल्लंघन करून धोकादायक ठिकाणी जात असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी बाराजण धबधबा आणि अभयारण्य परिसरात पर्यटकांच्या प्रवेशावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.

वन कर्मचाऱ्यांवर लाचखोरीचे आरोप

दरम्यान, दुर्घटनेच्या दिवशी बेळगाव, कर्नाटक आणि गोव्यातील शेकडो पर्यटक बाराजण धबधब्यावर पोहोचले होते. सुरुवातीला वन कर्मचाऱ्यांनी प्रवेश नाकारला, मात्र नंतर प्रत्येकी २०० रुपये घेऊन पर्यटकांना जंगलात प्रवेश दिल्याची चर्चा सुरू आहे. या आरोपांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

खानापूरच्या धबधब्यांबाबतही चिंता

बाराजण धबधबा दुर्घटनेनंतर आता खानापूर तालुक्यातील कणकुंबी, जांबोटी आदी परिसरातील धबधब्यांवरही पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता सुरक्षेचे उपाय तातडीने राबविण्याची मागणी होत आहे. अशीच दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × 1 =

error: Content is protected !!