बेळगाव : औद्योगिक आणि पॉवर क्षेत्रातील विश्वासार्ह नाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशपांडे इंडस्ट्रीजने यंदा आपल्या यशस्वी वाटचालीची सुवर्णमहोत्सवी नोंद करत डिझेल जनरेटर सेट आणि प्रगत इंजिनिअरिंग सोल्यूशन्स क्षेत्रातील ५० वर्षे पूर्ण केली आहेत. प्रामाणिकपणा, गुणवत्तापूर्ण सेवा आणि ग्राहकांचा विश्वास या भक्कम आधारावर उभारलेली ही संस्था आज तीन राज्यांतील २० हजारांहून अधिक ग्राहकांना सेवा देत आहे.

देशपांडे इंडस्ट्रीजची स्थापना स्वर्गीय देवराज देशपांडे आणि कुसुमा देशपांडे यांनी केली. सुरुवातीच्या काळात मिक्सर निर्मितीपासून सुरू झालेला हा व्यवसाय काळाच्या ओघात अधिक व्यापक आणि आधुनिक स्वरूपात विकसित होत गेला. १९८७ मध्ये भरत देशपांडे यांनी जनरेटर संचांच्या निर्मिती आणि जोडणी क्षेत्रात प्रवेश करून व्यवसायाला नवी दिशा दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मेधा देशपांडे यांच्या सहकार्याने कंपनी किर्लोस्कर ऑइल इंजिन्स आणि किर्लोस्कर इलेक्ट्रिक कंपनीची विश्वासार्ह ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर (OEM) बनली.
बेळगावमध्ये रुजलेल्या या उद्योगाने कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये मजबूत ग्राहकवर्ग निर्माण केला आहे. वाढत्या गरजांनुसार कंपनीने विविध औद्योगिक भागीदारीही विकसित केल्या. २००९ मध्ये महिंद्रा डिलरशिप मिळवत व्यावसायिक कामकाजाचा विस्तार करण्यात आला, तर २०२१ मध्ये ग्रीव्ह्ज कॉटन लिमिटेडची अधिकृत डिलरशिप मिळाल्याने डिझेल जनरेटर सेट विक्री, सेवा आणि सुटे भागांच्या क्षेत्रात कंपनीने आणखी बळकट स्थान निर्माण केले.
२०१० मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन अभियांत्रिकी तसेच एम्बेडेड सिस्टिम डिझाइनमधील उच्च शिक्षण पूर्ण करून श्रिया देशपांडे यांनी व्यवसायात प्रवेश केला. मार्केटिंग आणि धोरणात्मक नियोजनाच्या माध्यमातून त्यांनी कंपनीला आधुनिक व्यवसाय दृष्टिकोन दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीला किर्लोस्कर, महिंद्रा आणि ग्रीव्ह्जसारख्या नामांकित उद्योग समूहांकडून अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

व्यवसाय विस्ताराच्या दृष्टीने श्रिया देशपांडे यांनी उद्यमबाग येथे ‘श्रिया देशपांडे सेलिब्रेशन कन्व्हेन्शन हॉल अँड लॉन’ या आधुनिक आणि भव्य वास्तूची स्थापना केली. विवाहसोहळे, कौटुंबिक कार्यक्रम आणि कॉर्पोरेट उपक्रमांसाठी हे ठिकाण आज लोकप्रिय केंद्र ठरत आहे. याचबरोबर कंपनीने उद्यमबाग येथे अत्याधुनिक कार्यालय आणि फॅक्टरी इमारतीचे उद्घाटन करून प्रगतीच्या प्रवासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
देशपांडे इंडस्ट्रीजच्या यशामागे समर्पित कर्मचाऱ्यांची मोठी ताकद उभी आहे. कंपनीत ४० कर्मचारी आणि कामगार कार्यरत असून त्यापैकी अनेक जण गेल्या तीन दशकांहून अधिक काळ संस्थेशी निष्ठेने जोडलेले आहेत. विक्रीनंतरच्या सेवेला दिलेले प्राधान्य ही कंपनीची सर्वात मोठी ओळख मानली जाते. परिसरातील इतर कंपन्यांपेक्षा वेगळेपण जपत सर्व प्रकारच्या डिझेल जनरेटर सेटच्या देखभाल आणि सेवेसाठी २० प्रशिक्षित तज्ज्ञांचे स्वतंत्र इन-हाऊस सेवा पथक कंपनीकडे उपलब्ध आहे.
पाच दशकांच्या या यशस्वी प्रवासात देशपांडे इंडस्ट्रीजने प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि नैतिक व्यावसायिक मूल्ये यांना कधीही तिलांजली दिली नाही. स्पर्धेच्या कठीण काळातही ग्राहकांशी विश्वासाचे आणि दीर्घकालीन संबंध जपण्यावर कंपनीने भर दिला. त्यामुळेच आज कॉर्पोरेट क्षेत्र, सरकारी संस्था, खाजगी उद्योग आणि किरकोळ बाजारपेठ अशा विविध क्षेत्रांतील २० हजारांहून अधिक ग्राहक देशपांडे इंडस्ट्रीजवर विश्वास ठेवत आहेत.
सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त श्रिया देशपांडे, व्यवस्थापन आणि संपूर्ण टीमने ग्राहक, सहकारी, भागीदार आणि शुभेच्छुकांचे मनःपूर्वक आभार मानले असून, भविष्यातही गुणवत्तापूर्ण सेवा आणि विश्वासाची परंपरा अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
