एपीएमसी सचिवांना निवेदन; वार्षिक सभेच्या निमित्ताने सचिव विश्वनाथ रेड्डी यांचा सत्कार
बेळगाव : मार्केट यार्डमधील राजर्षी शाहू सोसायटीची स्वतःची इमारत असावी, हे व्यापारी व सभासदांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आहे. हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी सोसायटीच्या वार्षिक सभेचे औचित्य साधून एपीएमसी प्रशासनाकडून इमारतीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
यासाठी एपीएमसीचे सचिव विश्वनाथ रेड्डी यांना सोसायटी व समस्त व्यापारी बांधवांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सचिव विश्वनाथ रेड्डी यांचा संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व फळांची टोपली देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात शहीद जवान, दिवंगत सभासद तसेच नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. संस्थेचे संचालक हेमंत पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन प्रमुख पाहुणे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सोसायटीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाचा स्वीकार करताना एपीएमसी सचिव विश्वनाथ रेड्डी यांनी व्यापारी वर्गाच्या मागणीचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच व्यापाऱ्यांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान, वार्षिक सभेत संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन करण्यात आले व त्यास मंजुरी देण्यात आली. यावेळी ज्येष्ठ व्यापारी एन. एस. झंगरूचे, एन. बी. खांडेकर, एन. एस. कडूकर, कृष्णा बी. पाटील, चंद्रकांत खानोलकर आणि बसवंत मायानाचे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर चेअरमन सौ. बेबी टी. पाटील, व्हाईस चेअरमन राजू जाधव, संचालक राहुल होनगेकर, अशोक बामणे, सुरेश चौगुले, गजानन सुतार तसेच संचालिका सौ. शोभा एस. जाधव उपस्थित होते.
यावेळी एम. जी. मरणहोळकर, मोहन बेळगुंदकर, विश्वास घोरपडे, दीपक होनगेकर, अरुण कटांबळे, टी. एस. पाटील, यल्लापा चव्हाण, गजानन घोरपडे, बळवंत तरळे, हिरामणी बामणे, सुधीर पाटील, विश्वास टुमरी, के. बी. पाटील, भैरू रामा पाटील, राजू हंगिरकर, नंदू जाधव, शिवाजी तिप्पानाचे, प्रसाद नार्वेकर, प्रकाश देसाई, विनोद जाधव, प्रशांत कामू, अभिजीत मोरबाळे, सुरेश जाधव, प्रविण चांदीलकर, विनायक पाटील, तानाजी ईरोजी, जितेंद्र बामणे, शिवाजी पाटील, पिंटू परुळेकर, प्रशांत होनगेकर आणि राजू पाटील यांच्यासह व्यापारी, शेतकरी व कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक माणिक होनगेकर यांनी केले. संस्थेचा वार्षिक अहवाल कर्मचारी सुभाष कुराडे यांनी सादर केला, तर संचालक विक्रमसिंह कदम-पाटील यांनी आभार मानले.
राजर्षी शाहू सोसायटीची स्वतःची इमारत उभारण्यासाठी जागा उपलब्ध झाल्यास व्यापारी व सभासदांसाठी अधिक सक्षम सुविधा निर्माण होतील. त्यामुळे या मागणीचा एपीएमसी प्रशासनाने सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यापारी वर्गातून व्यक्त करण्यात आली.
