बेळगाव : आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व परिसरातील अनधिकृत कत्तलखाने तात्काळ बंद करण्यात यावेत तसेच गो-हत्त्या रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी श्रीराम सेना बेळगाव संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
उत्तर कर्नाटक राज्याध्यक्ष रविकुमार कोकितकर यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम सेना पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यानंतर माध्यमांशी बोलताना कोकितकर यांनी सांगितले की, २८ मे रोजी साजऱ्या होणाऱ्या बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी दिली जाते. त्यावेळी बकऱ्यांसोबत गाईंचीही हत्या केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
कर्नाटकात गो-हत्त्या बंदीचा कायदा अस्तित्वात असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे त्यांनी म्हटले. गाईंची तस्करी आणि अवैध हत्या सुरू असून हे थांबविण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करावी, रात्रंदिवस पोलीस गस्त वाढवावी तसेच अनधिकृत कसाईखाने बंद करावेत, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
गो-हत्त्या रोखण्यासाठी श्रीराम सेनेचे कार्यकर्ते सज्ज असल्याचे सांगताना, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन कोकितकर यांनी केले. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीस प्रशासन आणि सरकार जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी श्रीराम सेना उत्तर कर्नाटक उपाध्यक्ष विनय अंग्रोळी यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
