युवा नेतृत्वाला संधी; धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार
बेळगाव : बेळगावकरांच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपत मध्यवर्ती सार्वजनिक दसरा महोत्सव महामंडळाच्या माध्यमातून दरवर्षी दसरा महोत्सव शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. महामंडळाचे मानद अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली महोत्सवाचे आयोजन सातत्याने करण्यात येत आहे.
महामंडळाच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्याबरोबरच युवा वर्गाला संघटनेच्या कार्यात प्राधान्य देण्याच्या उद्देशाने पदाधिकाऱ्यांच्या एकमुखी निर्णयाने संदीप कामुले यांची मध्यवर्ती सार्वजनिक दसरा महोत्सव महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
संदीप कामुले यांच्या सामाजिक आणि संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे महामंडळाच्या कार्याला अधिक बळ मिळेल तसेच युवा वर्गाचा सहभाग वाढण्यास मदत होईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या निवडीप्रसंगी महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य आनंद आपटेकर, मार्गदर्शक मालोजीराव अष्टेकर, ज्येष्ठ उपाध्यक्ष दत्ता जाधव, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, सेक्रेटरी विजय तमुचे यांच्यासह लक्ष्मण किल्लेकर, प्रमोद बिरजे, श्रीनाथ पवार, ज्योतिबा आदी पदाधिकारी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी संदीप कामुले यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच महामंडळाच्या माध्यमातून धार्मिक परंपरा, सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक वारसा जपत आगामी काळात विविध उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
युवा नेतृत्वाला संधी देत महामंडळाच्या कार्याचा विस्तार करण्याच्या दिशेने संदीप कामुले यांची उपाध्यक्षपदी झालेली निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
