बेळगावातील प्रतिष्ठित द मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या ब्रिगेडियर तथा कमांडंटपदी सेना मेडल आणि विशिष्ट सेवा मेडल सन्मानित ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे सैन्य वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून बेळगावासाठीही ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
ब्रिगेडियर गिरीश उपाध्यय यांचा जन्म १ जुलै १९७२ रोजी कर्नाटकातील उडपी जिल्ह्यातील कडकेर येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सहकारी ज्युनिअर कॉलेज, कोटेश्वर येथे झाले, तर उच्च शिक्षण भंडारकर आर्ट्स अँड सायन्स कॉलेजमध्ये पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी इंडियन मिलिटरी अकॅडमी, देहराडून येथे लष्करी प्रशिक्षण घेतले आणि ७ डिसेंबर १९९६ रोजी द मराठा लाईट इन्फंट्रीच्या गौरवशाली १५ व्या बटालियनमध्ये अधिकारी म्हणून सेवेत दाखल झाले.
कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांनी ८ आसाम रायफल्समध्ये कंपनी कमांडर, द मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये ट्रेनिंग कंपनी कमांडर आणि ट्रेनिंग बटालियन कमांडर म्हणून काम केले. तसेच मुख्यालय २३ सेक्टर आसाम रायफल्समध्ये डीआयजी पदही भूषवले आहे.
याशिवाय त्यांनी एसओ-३ (गुप्तचर विभाग) मुख्यालय ९ सेक्टर आसाम रायफल्स, इम्फाळ येथे सेवा बजावली असून संयुक्त राष्ट्रांच्या डीआर काँगो मिशनमध्ये जी-२ (लष्करी माहिती) म्हणूनही महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. त्यांनी मुख्यालय आयडीएस, नवी दिल्ली येथे संचालक (भूदल/उभयचर विभाग), आर्मी वॉर कॉलेज, महू येथे डायरेक्टिंग स्टाफ तसेच मुख्यालय ४० माउंटन ब्रिगेड, तवांग येथे उपकमांडर म्हणूनही सेवा दिली आहे.
ब्रिगेडियर उपाध्यय यांनी द मराठा लाईट इन्फंट्रीच्या १५ व्या बटालियनचे नेतृत्व करताना बटालियनला नवे उच्चांक गाठून दिले. त्यांच्या उत्कृष्ट नेतृत्व आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना COAS प्रशस्तीपत्राने गौरविण्यात आले आहे. तसेच शौर्य आणि उल्लेखनीय लष्करी सेवेसाठी त्यांना दोन वेळा सेना मेडल आणि एक वेळा विशिष्ट सेवा मेडल प्रदान करण्यात आले आहे.
आता ते द मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या कमांडंटपदाची धुरा सांभाळणार असून त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्राची परंपरा, शिस्त आणि गौरव अधिक उंचावेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
