बेळगाव : महाराष्ट्रातील शेतकरी आज अभूतपूर्व आर्थिक संकटाचा सामना करत असून त्यांना तातडीने दिलासा मिळावा, यासाठी आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेल्या उपोषणाला सीमाभागातून जोरदार पाठिंबा मिळाला आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती (बेळगाव), श्रीराम सेना हिंदुस्तान आणि कृतिशील मराठा समाज या संघटनांनी संयुक्तपणे रोहित पवार यांच्या आंदोलनाला जाहीर व खंबीर पाठिंबा दर्शविला आहे.
या संदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात राज्यातील शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती अधोरेखित करण्यात आली आहे. सततची नापिकी, अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट, वाढता उत्पादन खर्च आणि शेतीमालाला मिळत नसलेला हमीभाव यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे खचला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटांच्या दुहेरी फटक्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन असह्य झाले असून अनेक कुटुंबांवर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे.
अशा परिस्थितीत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, त्यांच्या शेतीमालाला योग्य दर मिळावा आणि सरकारने शेतकरी हिताचे ठोस निर्णय घ्यावेत, या मागण्यांसाठी रोहित पवार यांनी सुरू केलेले उपोषण हे केवळ एका राजकीय नेत्याचे आंदोलन नसून शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी सुरू असलेला संघर्ष असल्याचे संघटनांनी म्हटले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि त्यांच्या स्वाभिमानासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला सीमाभागातील मराठी बांधवांचा पूर्ण पाठिंबा आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू राहिला पाहिजे आणि सरकारने तातडीने सकारात्मक भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
संघटनांच्या प्रतिनिधींनी रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर घेतलेली भूमिका ही काळाची गरज असल्याचे सांगत त्यांच्या आंदोलनाला नैतिक आणि सामाजिक पाठिंबा जाहीर केला. तसेच राज्यातील सर्व स्तरांतील नागरिक, शेतकरी संघटना आणि सामाजिक संस्थांनीही या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी रमाकांत कोंडुस्कर, अमित देसाई, विजय बाडीवाले, राजेंद्र बैलूर आणि विनोद बिर्जे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
