अमित शहा यांचा दौरा संपेपर्यंत समिती कार्यकर्ते स्थानबद्ध; दिवसभर अडवणूक, रात्री उशिरा सुटका
कोल्हापूर / बेळगाव :
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान महाराष्ट्राच्या मातीवर उभे राहून संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्याप्रकरणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सात कार्यकर्त्यांना शाहूपुरी पोलीस ठाण्यातून नोटीस बजावण्यात आल्याने सीमाभागात संतापाची लाट उसळली आहे. सीमाप्रश्नाची बाजू थेट केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोल्हापूरमध्ये दाखल झालेल्या समितीच्या कार्यकर्त्यांना दिवसभर अडवण्यात आले, स्थानबद्ध करण्यात आले आणि अखेर घोषणाबाजी केल्याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.
सीमाप्रश्नाबाबत निवेदन सादर करण्यासाठी आणि अमित शहा यांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने मोठ्या प्रमाणावर नियोजन केले होते. कोल्हापूर जिल्हा प्रशासन, महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते आणि विविध लोकप्रतिनिधींमार्फत भेटीसाठी प्रयत्न करण्यात आले होते. अनेक स्तरांवरून सकारात्मक आश्वासनेही मिळाली होती. मात्र प्रत्यक्षात समितीच्या कार्यकर्त्यांच्या पदरी उपेक्षा आणि पोलिसी कारवाईच आली.
अमित शहा यांच्या सभास्थळाकडे जाणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी विविध ठिकाणी अडवले, तर काहींना ताब्यात घेऊन स्थानबद्ध करण्यात आले. तरीही काही कार्यकर्ते पोलिसांचा बंदोबस्त भेदून सभास्थळी पोहोचले आणि संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या. सभेमध्ये अचानक झालेल्या या घोषणांमुळे काही काळ खळबळ उडाली. सीमाप्रश्नाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न असल्याचे समितीच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.
घोषणाबाजीनंतर पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्यांची माहिती गोळा करून कारवाईची प्रक्रिया सुरू केली. विशेष म्हणजे, अमित शहा यांचा कोल्हापूरमधील कार्यक्रम संपल्यानंतरही समितीच्या कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आली नाही. कोल्हापूरमधील कार्यक्रमानंतर इचलकरंजी येथे होणारी सभा संपेपर्यंत अनेक कार्यकर्त्यांना एका ठिकाणी स्थानबद्ध करून ठेवण्यात आले होते.
अमित शहा यांचा संपूर्ण कोल्हापूर जिल्हा दौरा संपून ते विमानतळावरून रवाना झाल्यानंतरच कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आली. मात्र त्यानंतरही पोलिसांची कारवाई सुरूच राहिली. संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिलेल्या सात कार्यकर्त्यांना शाहूपुरी पोलीस ठाण्यात बोलावून अधिकृत नोटिसा बजावण्यात आल्या.

या कारवाईची जबाबदारी पोलीस निरीक्षक संतोष डाके यांनी सांभाळली. नोटीस देण्याच्या प्रक्रियेच्या नावाखाली संबंधित कार्यकर्त्यांना सुमारे दोन तास पोलीस ठाण्यातच थांबवून ठेवण्यात आले. रात्री सुमारे आठच्या सुमारास नाट्यमय घडामोडीनंतर कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आली.
दरम्यान, या कारवाईची माहिती मिळताच हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याचे समजते. कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात येणारी कारवाई आणि संभाव्य गुन्हे मागे घेण्याबाबत त्यांनी पोलिस अधीक्षकांकडे पाठपुरावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्या हस्तक्षेपानंतर पोलीस प्रशासनाकडून केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा प्रोटोकॉलमुळे ही कारवाई करण्यात आल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. मात्र ही केवळ सारवासारव असल्याची प्रतिक्रिया समितीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
या घटनेमुळे सीमाभागात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महाराष्ट्राच्या भूमीवर उभे राहून संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांवर नोटिसा बजावल्या जात असतील, तर ही मराठी अस्मिता आणि सीमालढ्याची गळचेपी असल्याची भावना सीमावासीयांमध्ये व्यक्त होत आहे. सीमाप्रश्नासाठी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच संशयितांप्रमाणे वागणूक देण्यात आल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
“कर्नाटकात मराठी माणसाला दडपले जाते आणि महाराष्ट्रातही संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देणाऱ्यांवर कारवाई होते, मग सीमावासीयांनी न्यायासाठी कोणाकडे पाहायचे?” असा संतप्त सवाल सीमा भागातून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या सर्व घटनांनंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. “आम्हाला नोटिसा देता येतील, स्थानबद्ध करता येईल; पण सीमावासीयांचा आवाज दाबता येणार नाही. सीमाप्रश्नाचा न्याय्य तोडगा निघेपर्यंत संघर्ष अधिक तीव्रतेने सुरू राहील,” असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.
