मराठा समाजातील तरुणांसाठी गल्लीवार बैठका घेण्याचा निर्णय

मराठा समाजातील तरुणांसाठी गल्लीवार बैठका घेण्याचा निर्णय

बेळगाव : मराठा समाजातील भरकटलेल्या तरुणांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना सकारात्मक दिशा देण्यासाठी गल्लीवार व विभागवार बैठका घेऊन विचारमंथन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला.

मेलगे गल्ली, शहापूर येथील मंडळाच्या सभागृहात वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रकाश मरगाळे होते. व्यासपीठावर कार्याध्यक्ष शिवराज पाटील, सहचिटणीस संग्राम गोडसे, खजिनदार के. एल. मजूकर, कार्यकारिणी सदस्य ईश्वर लगाडे, सुरेंद्र जाधव, दत्तात्रय जाधव, राजू पावले आणि प्रकाश गडकरी उपस्थित होते.

सभेत समाजातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मुहूर्तावर विवाह संपन्न होणे, उपवर मुलांची वाढती संख्या, शैक्षणिक प्रगती तसेच दीर्घकाळ लांबणारा गणेशोत्सव विसर्जन सोहळा याबाबत अनेकांनी चिंता व्यक्त केली. समाजातील गल्लीवार पंच मंडळी आणि युवक मंडळांना भेटून त्यांच्या समस्या व सूचना जाणून घेण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली.

समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळावी यासाठी शैक्षणिक निधी उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला. यावेळी उमेश पाटील यांनी १५ हजार रुपये, तर विनोद आंबेवाडीकर आणि सतीश देसाई यांनी प्रत्येकी ५ हजार रुपयांची रोख देणगी दिली. लक्ष्मण मेणसे आणि प्रा. नीता पाटील यांनी प्रत्येकी ५ हजार रुपयांची देणगी जाहीर केली. समाजातील सधन व्यक्तींनी या निधीस लवकरात लवकर यथायोग्य मदत करावी, असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले.

समाजातील महिलांना विविध क्षेत्रांत प्रोत्साहन देण्यासाठी महिला विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याची जबाबदारी प्रा. नीता पाटील यांच्यावर सोपविण्यात आली.

सभेत नेताजी जाधव, सतीश देसाई, मोहन कंग्राळकर, रणजीत हावळण्णाचे, प्रदीप चव्हाण, श्रीधर खन्नूकर, संदीप मुतकेकर आदींनी विविध उपयुक्त सूचना मांडल्या.

कार्याध्यक्ष शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. सहचिटणीस संग्राम गोडसे यांनी मागील वर्षाचे इतिवृत्त वाचून त्यास मंजुरी घेतली. खजिनदार के. एल. मजूकर यांनी सन २०२५-२६ चा जमाखर्च व ताळेबंद सादर केला असून त्यासही मंजुरी देण्यात आली. सन २०२६-२७ साठी लेखापरीक्षक म्हणून अनिल मंडोळकर आणि सहाय्यक म्हणून सुनील आनंदाचे यांच्या नावास मंजुरी देण्यात आली. ईश्वर लगाडे यांनी आभार मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 − 7 =

error: Content is protected !!