मंडोळी रोड परिसरातील घटनेने खळबळ; कारपाठोपाठ मोटारसायकल जातानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती
बेळगाव : गणेशोत्सवाच्या काळात शहरात गुन्हेगारी प्रकार समोर येत असतानाच, मंडोळी रोड परिसरात एका तरुणावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. रविवारी रात्री मंडोळी रोड, भवानी नगर आणि वाटवे कॉलनी परिसरात रात्री ९ ते १० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सांबरा रोड परिसरातील एका तरुणाला मंडोळी रोडवर बोलावून घेण्यात आले. त्याच्यावर टोळक्याने तीक्ष्ण हत्याराने हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या तरुणाला कारच्या डिक्कीत कोंबून टोळक्याने तेथून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या माहितीची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
संबंधित तरुण रविवारी रात्रीपासून बेपत्ता असून त्याचा मोबाईल फोनही स्विच ऑफ आहे. त्यामुळे हल्ल्यात जखमी झालेला तरुण हाच बेपत्ता तरुण आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. सोमवारी रात्रीपर्यंत जखमी तरुण नेमका कुठे आहे आणि त्याची प्रकृती काय आहे, याचा उलगडा झालेला नव्हता.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
घटनेचा माग काढण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम हाती घेतले आहे. एका कारच्या पाठोपाठ मोटारसायकल जातानाचे फुटेज पोलिसांना उपलब्ध झाले आहे. मंडोळी रोडवरून निघालेली कार नेमकी कुठे गेली, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध शक्यता तपासल्या जात आहेत.
हल्ला केल्याचा संशय असलेल्या व्यक्तीचा रविवारी रात्रीपासून शोध घेतला जात आहे. पोलिस यंत्रणेला एका संशयित हल्लेखोराचे नाव समजल्याची माहिती असून त्याचा शोध सुरू आहे.
तरुणाला बोलावून घेण्यासाठी तरुणीचा वापर?
दरम्यान, एका तरुणीचा वापर करून संबंधित तरुणाला मंडोळी रोडपर्यंत बोलावून घेण्यात आले आणि त्यानंतर त्याच्यावर हल्ला करण्यात आला, अशी माहिती तपासातून समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. या माहितीचीही पोलिसांकडून अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे.
या घटनेमागे मंडोळी रोड परिसरातील कथित जुगार अड्ड्याचा संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मटका व जुगार सुरू असल्याची चर्चा असून, काही ठिकाणी जुगारी अड्डे सुरू असल्याचे वृत्त आहे. रविवारी रात्री तरुणावर हल्ला करणारा संशयित याच परिसरात जुगाराचा अड्डा चालवत असल्याची माहितीही समोर आली आहे.
विशेष म्हणजे, रविवारी हल्ला केल्याचा संशय असलेल्या व्यक्तीवर यापूर्वीही चाकू हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या मंडोळी रोड परिसरात मोठ्या प्रमाणात जुगाराचा अड्डा चालत असल्याची माहिती असून, या सर्व बाबींचा घटनेशी संबंध आहे का, याचाही पोलिस तपास करत आहेत.
वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त एन. व्ही. बर्मनी, बेळगाव ग्रामीणचे एएसपी मल्लनकवडा नायकर यांच्यासह पोलिस अधिकारी वाटवे कॉलनी परिसरात दाखल झाले. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, वाहनांच्या हालचाली आणि संशयित व्यक्तींच्या संपर्कांचा तपास केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले असून अधिक माहिती देण्यास नकार देण्यात आला. संशयित हल्लेखोरांना अटक झाल्यानंतरच या घटनेमागील नेमके कारण, हल्ल्यातील व्यक्तींची भूमिका आणि बेपत्ता तरुणाचा ठावठिकाणा याबाबत अधिक स्पष्ट माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
