समर्थ नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम उत्साहात

समर्थ नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम उत्साहात

बेळगाव : श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, समर्थ नगर, बेळगाव यांच्यावतीने गणेश चतुर्थीनिमित्त विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना परिसरातील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसोबतच त्यांच्या कलागुणांना आणि वक्तृत्व कौशल्याला वाव मिळावा, या उद्देशाने सामान्य ज्ञान परीक्षा, निबंध लेखन, चित्रकला, श्लोक पठण आणि भाषण स्पर्धा घेण्यात आल्या. विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत आपले ज्ञान व कलागुण सादर केले.

निबंध लेखन स्पर्धेसाठी लोकमान्य टिळक आणि सार्वजनिक गणेशोत्सव, गणेशोत्सवातून मिळणारे संस्कार, सार्वजनिक गणेशोत्सवाची सामाजिक भूमिका तसेच गणेशोत्सव आणि युवकांची सामाजिक जबाबदारी असे विषय देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी मराठी, इंग्रजी आणि कन्नड भाषेत निबंध लिहून सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाला निवृत्त शासकीय शिक्षिका सौ. प्रतिभा लक्ष्मण साडेकर तसेच बालभारती विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. रूपा मळण्णवर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणासोबतच संस्कार, सामाजिक जाणीव आणि विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.

तसेच SSLC, PUC आणि Degree परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता ज्ञान, संस्कार, कला, सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा उत्सव व्हावा, या उद्देशाने मंडळातर्फे दरवर्षी अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक, मार्गदर्शक, परीक्षक आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nine − four =

error: Content is protected !!