१ नोव्हेंबरच्या काळ्या दिनाच्या निषेध मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा

१ नोव्हेंबरच्या काळ्या दिनाच्या निषेध मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा

बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती आणि युवा आघाडीतर्फे मंडोळी, हंगरगा परिसरात जनजागृती बैठका

बेळगाव : प्रतिनिधी

१ नोव्हेंबर हा सीमाभागातील मराठी भाषिकांकडून पाळण्यात येणारा काळा दिन यशस्वी करण्यासाठी तसेच या दिवशी आयोजित निषेध मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती आणि युवा आघाडीच्या वतीने मंडोळी व हंगरगा परिसरात बैठका घेण्यात आल्या. या बैठकांमध्ये मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या भावना व्यक्त कराव्यात, असे आवाहन करण्यात आले.

महाराष्ट्रात सामील होण्याच्या मागणीसाठी सीमाभागातील मराठी भाषिक गेल्या अनेक वर्षांपासून लोकशाही मार्गाने लढा देत आहेत. १ नोव्हेंबर १९५६ रोजी भाषावार प्रांतरचनेच्या वेळी मराठीबहुल सीमाभाग तत्कालीन म्हैसूर राज्यात समाविष्ट करण्यात आला. या निर्णयाचा निषेध म्हणून सीमाभागातील मराठी भाषिक दरवर्षी १ नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळतात.

याच पार्श्वभूमीवर बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती आणि युवा आघाडीच्या वतीने विविध गावांमध्ये बैठका घेऊन जनजागृती करण्यात येत आहे. काळ्या दिनाच्या निषेध मोर्चात युवकांसह ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यकर्त्यांनी केले.

या बैठकांना माजी आमदार मनोहर किणेकर, राजू किणेकर, आनंद पाटील बेनकहळ्ळी, नारायण दळवी, बाबासाहेब फगरे, लक्ष्मण नावगेकर, धाकलु पाटील, परशराम शहापूरकर, मोनाप्पा पाटील, पिराजी पाटील, शांताराम कसलकर, बाळू पेडणेकर, राजू कणबरकर, आनंद पाटील, कल्लाप्पा पाटील, राजू ध. कणबरकर, कृष्णा हुंदरे, सोमनाथ दळवी, केदारी कणबरकर, प्रवीण हुंदरे, यल्लाप्पा गेणुचे, नारायण पाटील, महादेव पाटील, मनोहर दळवी आणि सचिन दळवी यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काळ्या दिनाच्या निषेध मोर्चात मराठी भाषिकांनी एकजुटीने सहभागी होऊन सीमाप्रश्नाबाबतचा आपला निषेध नोंदवावा, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती आणि युवा आघाडीच्या वतीने करण्यात आले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

19 − 6 =

error: Content is protected !!