१ नोव्हेंबरच्या काळ्या दिनानिमित्त सायकल फेरी व धरणे आंदोलनात बहुसंख्येने सहभागी व्हा

१ नोव्हेंबरच्या काळ्या दिनानिमित्त सायकल फेरी व धरणे आंदोलनात बहुसंख्येने सहभागी व्हा

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे आवाहन; पिरणवाडी येथे बैठक

बेळगाव : प्रतिनिधी

सीमाभागातील मराठी भाषिकांच्या भावनांचा आदर करून सीमाप्रश्नाची सोडवणूक व्हावी, या मागणीसाठी गेल्या अनेक दशकांपासून लढा सुरू आहे. या लढ्याच्या पार्श्वभूमीवर १ नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्त बेळगाव येथे आयोजित मूक सायकल फेरीसह सीमाभागातील विविध ठिकाणी होणाऱ्या लाक्षणिक धरणे आंदोलनात मराठी भाषिकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागतर्फे करण्यात आले.

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागची बैठक पिरणवाडी येथे पार पडली. ज्येष्ठ नेते पिराजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत १ नोव्हेंबरच्या काळ्या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली.

यावेळी नगरसेवक तथा संघटनेचे खजिनदार शिवाजी मंडोळकर यांनी, गेल्या ७० वर्षांपासून सुरू असलेल्या सीमालढ्याला न्याय मिळवून देण्यासाठी मराठी भाषिकांची एकजूट महत्त्वाची असल्याचे सांगितले. येत्या १ नोव्हेंबरला बेळगाव येथे आयोजित मूक सायकल फेरीत मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपली एकजूट दाखवून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

सीमालढ्याची ताकद पुन्हा दाखवून देण्याचे आवाहन

युवा समितीचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी सीमाप्रश्नाच्या इतिहासाचा उल्लेख करत मराठी भाषिकांनी अनेक आंदोलने केली असून, या लढ्यात अनेकांनी हौतात्म्य पत्करले, तर अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला, असे सांगितले. तरीही सीमाप्रश्नाची सोडवणूक झालेली नसल्याने हा लढा सुरू ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

१ नोव्हेंबर रोजी बेळगाव येथे होणारी निषेध सायकल फेरी तसेच खानापूर, निपाणी, बिदर, भालकी आणि कारवार येथे आयोजित धरणे सत्याग्रह यशस्वी करण्यासाठी मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. या माध्यमातून सीमाभागातील जनतेच्या भावना आणि एकजूट पुन्हा एकदा दाखवून द्यावी, असे आवाहन धनंजय पाटील यांनी केले.

पुण्यातही सीमावासीयांच्या समर्थनार्थ धरणे आंदोलन

पुणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे १ नोव्हेंबर रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सीमावासीयांच्या समर्थनार्थ एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. पुणे परिसरातील मराठी भाषिकांनीही या आंदोलनात सहभागी होऊन सीमाप्रश्नाबाबत पाठिंबा दर्शवावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात पिराजी मुचंडीकर यांनी १ नोव्हेंबरच्या काळ्या दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये मराठी भाषिकांनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.

शुभम शेळके आणि मनोहर हुंदरे यांच्या अटकेबाबत चर्चा

बैठकीत महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके आणि सरचिटणीस मनोहर हुंदरे यांच्या अटकेच्या विषयावरही चर्चा झाली. या प्रकरणात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयीन प्रक्रियेला प्राधान्य देऊन वकिलांच्या माध्यमातून जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले.

या अटकेनंतर अनेक मराठी भाषिक आणि समितीप्रेमींनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून निषेध व्यक्त केला आणि संघटनेच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले. या सर्वांचे बैठकीत आभार मानण्यात आले.

यावेळी अशोक घगवे, शिवाजी मंडोळकर, शिवाजी हावळानाचे, रणजित हावळानाचे, अभिजीत मजुकर, प्रवीण गुंडोजी, सुशांत देसाई, विनायक पवार, निलेश शहापूरकर, जोतिबा येळूरकर, राजू पाटील, नारायण मुचंडिकर आणि विजय पाटील यांच्यासह युवा समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

१ नोव्हेंबरच्या काळ्या दिनानिमित्त आयोजित सायकल फेरी आणि विविध ठिकाणच्या धरणे आंदोलनात मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागतर्फे करण्यात आले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

8 + 4 =

error: Content is protected !!