बेळगाव, ता. १९ :
गोकाक येथे फिरण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा पाण्यात पाय घसरून बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सोशल वर्कर रेस्क्यू टीम, बेळगाव, एसडीआरएफ (SDRF) आणि गोकाक अग्निशमन दल यांनी संयुक्तपणे शोधमोहीम राबवून युवकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.
घटनेची माहिती रविवारी रात्री उशिरा मिळाल्यानंतर सोशल वर्कर रेस्क्यू टीमचे सदस्य अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हूळी, निलेश हिरेहोळी आणि मायकेल पिंटो तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी एसडीआरएफ आणि गोकाक अग्निशमन दलाच्या जवानांसह कठीण परिस्थितीत शोधमोहीम राबवून युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले.
या वेळी स्थानिक नागरिकांनी तसेच प्रशासनाने सोशल वर्कर रेस्क्यू टीम, एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या तत्पर, निस्वार्थ आणि धाडसी कार्याचे कौतुक केले.
घटनेनंतर सोशल वर्कर रेस्क्यू टीमने नागरिकांना आणि पर्यटकांना आवाहन करताना सांगितले की, पावसाळ्यात धबधबे, नद्या, तलाव आणि इतर जलाशय परिसरात फिरताना अत्यंत सावधगिरी बाळगावी. सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करून कोणताही धोका पत्करू नये, जेणेकरून अशा दुर्दैवी घटना टाळता येतील.
“Always Prepared To Serve” हे ब्रीद कायम जपत गरज पडेल तेव्हा तत्काळ मदतीसाठी सज्ज असल्याचा विश्वास सोशल वर्कर रेस्क्यू टीमने व्यक्त केला.
