बेधडक बेळगाव वृत्तसेवा | बेळगाव
बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार पेठ, टिळकवाडी येथील डॉ. नीता देशपांडे डायबेटीस सेंटरमध्ये अध्यक्ष विश्वास धुराजी यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष के. एल. मजूकर, चिटणीस सुरेंद्र देसाई, सहचिटणीस शिवराज पाटील, खजिनदार विनिता बाडगी, कार्यकारिणी सदस्य विजय वाईगडे, वनिता जोशी, स्नेहलता जुवळी, विठ्ठल पोळ, उल्हास पानसे, बाळकृष्ण बिर्जे तसेच सल्लागार संचालक प्रकाश कुडतरकर उपस्थित होते.
प्रारंभी रविंद्रनाथ जुवळी आणि स्नेहलता जुवळी यांच्या प्रार्थनेनंतर दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सुरेंद्र देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले व मागील सर्वसाधारण सभेचा वृत्तांत सादर केला. के. एल. मजूकर यांनी वर्षभरात सोसायटीने राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.
खजिनदार विनिता बाडगी यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षण अहवालाचे वाचन केले, तर विजय वाईगडे यांनी २०२६-२७ सालच्या अंदाजपत्रकाचे सादरीकरण केले. यावेळी २०२६-२७ या वर्षासाठी लेखापरीक्षक म्हणून गाडगीळ अँड उप्पीन कंपनीची फेरनिवड करण्यात आली.
सभेदरम्यान रिक्त झालेल्या कार्यकारिणी मंडळाच्या दोन जागांसाठी उल्हास पानसे आणि बाळकृष्ण बिर्जे यांची एकमताने निवड करण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात विश्वास धुराजी यांनी सभासदांच्या सहकार्यामुळेच संघटनेची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे सांगितले. यावेळी सभासदांनी विविध सूचना मांडल्या. शिवराज पाटील यांनी आभार मानले, तर विठ्ठल पोळ यांनी सूत्रसंचालन केले.
या सभेला बहुसंख्य आजीव सभासद उपस्थित होते.
