पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मराठी विद्यानिकेतनची जनजागृती मोहीम

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मराठी विद्यानिकेतनची जनजागृती मोहीम

बेधडक बेळगाव वृत्तसेवा | बेळगाव

पर्यावरणपूरक आणि डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी मराठी विद्यानिकेतन, बेळगावच्या जागृती मंच विभागाच्या वतीने गुरुवारी (दि. १० सप्टेंबर) विशेष अभियान राबविण्यात आले.

या मोहिमेत नागरिकांना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी माती किंवा शाडूच्या गणेशमूर्तींची स्थापना करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच गणपतीची सजावट फुले, पाने, कागद यांसारख्या नैसर्गिक वस्तूंनी करण्यावर भर देण्यात आला. फटाक्यांमुळे होणारे हवेचे प्रदूषण आणि शारीरिक इजा टाळण्यासाठी फटाके न वाजवण्याचे आवाहनही करण्यात आले.

लाऊडस्पीकर, डॉल्बी, लेझर किरणे आणि डीजेमुळे होणारे ध्वनी प्रदूषण लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि आजारी व्यक्तींसाठी घातक ठरत असल्याने पर्यावरणपूरक व डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.

उपक्रमाची सुरुवात धर्मवीर संभाजी चौक येथे जनजागृती सभेने झाली. त्यानंतर विद्यार्थी व शिक्षकांच्या तीन गटांनी हुतात्मा चौक, धर्मवीर संभाजी चौक आणि वनिता विद्यालय परिसरात जनजागृती पत्रकांचे वाटप केले. विविध घोषणांद्वारे नागरिकांना पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमात ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. शिवाजी कागणीकर, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, उपाध्यक्ष सुरेश पाटील, जागृती मंच प्रमुख व शिक्षण संयोजिका नीला आपटे, शिक्षक समन्वयक सविता पवार, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, बालवाडी विभाग प्रमुख सीमा कंग्राळकर, शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले, अरुण बाळेकुंद्री, गजानन सावंत, धीरज राजपूत, बी. एम. पाटील, महेश हगीदळे तसेच शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 − 19 =

error: Content is protected !!