बेळगाव : बेळगाव उत्तर विभागस्तरीय ८व्या कर्तव्य कूट-२०२६ स्पर्धेत बेळगाव शहर पोलीस पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल १३ पुरस्कार पटकावले आहेत. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर बेळगाव शहर पोलीस पथकाने विभागस्तरावर सर्वोत्कृष्ट द्वितीय स्थान मिळविले.
विविध तांत्रिक, वैज्ञानिक तसेच विशेष पोलीस कौशल्यांच्या स्पर्धांमध्ये बेळगाव शहर पोलिसांनी प्रभावी कामगिरी केली. या स्पर्धांमध्ये ११ पदके आणि २ ट्रॉफी अशी एकूण १३ पारितोषिके पथकाने मिळविली.
पोलीस निरीक्षक मंजुनाथ बडिगेर यांनी मेडिको-लीगल प्रकारात तृतीय क्रमांक मिळविला. पोलीस उपनिरीक्षक संतोष दळवाई यांनी फिंगरप्रिंट प्रॅक्टिकल टेस्टमध्ये प्रथम, मेडिको-लीगलमध्ये द्वितीय आणि हँडलिंग, लिफ्टिंग, पॅकिंग टेस्टमध्ये तृतीय क्रमांक मिळविला.
खडेबाजार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सरदारगौड मुत्तत्ती यांनी हँडलिंग, लिफ्टिंग व पॅकिंग टेस्टमध्ये द्वितीय, फिंगरप्रिंट प्रॅक्टिकल टेस्टमध्ये तृतीय तसेच फॉरेन्सिक सायन्स लेखी परीक्षेत तृतीय क्रमांक पटकावला.
बेळगाव शहर डॉग स्क्वॉडचे एपीसी रुद्रय्या माविनकट्टीमठ यांच्या नेतृत्वाखालील श्वान पथकानेही दमदार कामगिरी केली. क्राईम ट्रॅकर प्रकारात प्रथम क्रमांक, डॉग स्क्वॉड ओव्हरऑल चॅम्पियन ठरत विजेता ट्रॉफी तसेच बेस्ट रेंज डॉगचा पुरस्कार मिळविला.
याशिवाय ग्राउंड सर्च प्रकारात एएससी अजित आर. पाटील यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. पोलीस फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी चाचणीत एआरएसआय एस. एम. गडकरी यांनी प्रथम, तर एपीसी राकेश तळवार यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
या स्पर्धेत बेळगाव शहर पोलीस पथकाने दाखविलेली शिस्त, समर्पण, व्यावसायिक कौशल्य, संघभावना आणि कर्तव्यनिष्ठेमुळे हे यश मिळाल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले.
आरपीआय जे. एच. शेख, सीआर विभाग, बेळगाव शहर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली. या यशाबद्दल बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त तसेच डीसीपी (का. सु.), डीसीपी (अ. सु.) आणि डीसीपी (सीआर) यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या कामगिरीची दखल घेत विशेष बक्षीस जाहीर करून प्रोत्साहन दिले आहे.
