लक्ष्मी नगर येथील महालक्ष्मी मंदिराचा वार्षिकोत्सव उत्साहात

लक्ष्मी नगर येथील महालक्ष्मी मंदिराचा वार्षिकोत्सव उत्साहात

अनिष्ट प्रथांना फाटा देत सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श

श्री महालक्ष्मी समाज मंदिर येथे यंदाचा वार्षिक उत्सव अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. हिंडलगा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या लक्ष्मी नगर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवाने धार्मिकतेसोबतच सामाजिक बांधिलकीचाही संदेश दिला.

यंदा महालक्ष्मी मंदिराच्या वार्षिक उत्सवाचे ३३ वे वर्ष होते. उत्सवानिमित्त पहाटेपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती दागिने आणि फुलांनी सुंदररीत्या सजवण्यात आली होती.

सकाळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. संपूर्ण गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. ग्रामस्थ आणि भाविकांनी विविध ठिकाणी पालखीचे जल्लोषात स्वागत केले. पालखी मंदिरात परतल्यानंतर सुवासिनींसाठी ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर देवस्थान पंच कमिटी, मान्यवर आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत सामूहिक आरती पार पडली.

या उत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे येथे अनेक अनिष्ट प्रथांना पूर्णपणे फाटा देण्यात आला आहे. पशू बळी, आहेर स्वीकारणे यांसारख्या प्रथा नाकारून हा उत्सव सामाजिक आणि कौटुंबिक स्वरूपात साजरा केला जातो. उत्सवादरम्यान मांसाहार पूर्णपणे वर्ज्य ठेवण्यात येतो आणि सर्वांसाठी गोड जेवणाचा बेत आखण्यात येतो. यंदाही हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

याशिवाय सामाजिक बांधिलकी जपत ‘एस बी जी’ संस्थेच्या वतीने ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. धार्मिक उत्सवासोबत समाजोपयोगी उपक्रम राबवण्याची परंपरा या देवस्थानाने कायम ठेवली आहे.

दत्ता कानुरकर यांनी सांगितले की, “अनेक गावांमध्ये यात्रांचे स्वरूप वेगळे असते. काही ठिकाणी आजही पशू बळी किंवा आहेर स्वीकारण्याच्या प्रथा पाळल्या जातात. मात्र, लक्ष्मी नगर येथील महालक्ष्मी मंदिरात स्थापना झाल्यापासून अशा सर्व प्रथांना फाटा देण्यात आला आहे. आम्ही धार्मिक उत्सवासोबत विविध सामाजिक उपक्रमही राबवतो. हा एक शुद्ध सामाजिक आणि कौटुंबिक उत्सव आहे.”

उत्सवानिमित्त देवीची आकर्षक आरास लक्ष्मी कानूरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली होती. या सोहळ्याला कृष्णा बाडीवाले, प्राजक्त केकरे, सुरेश पाटील, राजन टाकळकर, शिवाजी बाडीवाले, शंकर गर्डे, दिनकर गवस, किशोर उरणकर, श्रीकांत लोकरे, सच्चिदानंद चिकोर्डे यांच्यासह महिला मंडळाच्या पदाधिकारी, सदस्या आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × two =

error: Content is protected !!