अंकलीहून माऊलींच्या मानाच्या अश्वांचे आळंदीकडे प्रस्थान; १९४ वर्षांची परंपरा कायम

अंकलीहून माऊलींच्या मानाच्या अश्वांचे आळंदीकडे प्रस्थान; १९४ वर्षांची परंपरा कायम

मोती व हिरा या मानाच्या अश्वांसह ३०० किमी आषाढी वारीच्या प्रवासाला सुरुवात; भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

बेळगाव / अंकली : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अंकली येथून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींचा मानाचा अश्व ‘मोती’ आणि जरीपटक्याचा मानाचा अश्व ‘हिरा’ यांचा अंकली ते आळंदी असा सुमारे ३०० किलोमीटरच्या पायी प्रवासाला पारंपरिक धार्मिक विधींसह प्रारंभ झाला. यावेळी हजारो वारकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

अंकली येथील शितोळे घराण्याकडे गेल्या १९४ वर्षांपासून माऊलींच्या अश्वसेवेची मानाची परंपरा आहे. हैबतबाबा आरफळकर यांनी पालखी सोहळ्याला शिस्तबद्ध स्वरूप दिल्यानंतर माऊलींच्या अश्वांचा आणि तंबूचा मान शितोळे घराण्याकडे आला. ही परंपरा सध्या श्रीमंत ऊर्जितसिंह राजे शितोळे सरकार आणि त्यांचे पुत्र महादजीराजे शितोळे सरकार निष्ठेने पुढे नेत आहेत.

राजवाड्यातील अंबाबाई मंदिरात सकाळी पूजन व आरती करण्यात आली. जरीपटक्याचे पूजन करून चिकोडी-सदलगा मतदारसंघाचे आमदार गणेश हुक्केरी यांच्या हस्ते दोन्ही अश्वांचे पूजन करण्यात आले. यावेळी विहानराजे शितोळे सरकार उपस्थित होते.

राजवाड्यातून अश्व बाहेर पडताच भाविकांनी पाणी घालून ओवाळणी केली आणि दर्शन घेतले. गावातील पारंपरिक मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. वेशीवर अश्वांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

यावेळी राणोजीराजे घोरपडे, राजाभाऊ थोरात, पालखी सोहळा प्रमुख विक्रम महाराज मोरे, विलास तात्या बालवडकर, निवृत्ती आबा कोळेकर, सौरभ शिंदे, संदीप काळे, योगेश गोंधळे, योगेश आरू, अनिल चौधरी, नितीन कपलेश्वरी, श्री बेरगी, शिवराज पाटील, राजश्री हलगेकर, ज्ञानेश्वरी कार्लेकर यांच्यासह अंकली, जुगूळ, चंदूर, मांजरीवाडी, काडापूर व परिसरातील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आषाढी वारीच्या प्रवासात तुकाराम कोळी आणि अक्षय परीट हे अश्वचालक म्हणून सेवा बजावणार आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

sixteen + 7 =

error: Content is protected !!