महामेळाव्याच्या नियोजनासाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची शुक्रवारी बैठक

महामेळाव्याच्या नियोजनासाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची शुक्रवारी बैठक

२ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन; महामेळावा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बुधवार, २ डिसेंबरपासून बेळगाव येथील सुवर्ण विधानसौधमध्ये सुरू होत आहे. या अधिवेशनाला प्रत्युत्तर म्हणून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या वतीने पहिल्याच दिवशी महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. हा महामेळावा यशस्वी करण्याच्या दृष्टीने बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हरब्रिज) येथे आयोजित करण्यात आली आहे.

दरवर्षी कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये भरविण्यात येते. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सीमाभागातील मराठी भाषिकांच्या भावना आणि विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महामेळाव्याचे आयोजन केले जाते.

यंदाचा महामेळावा यशस्वी करण्यासाठी जनजागृती, नियोजन आणि कार्यकर्त्यांच्या सूचना जाणून घेण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत महामेळाव्याच्या आयोजनासंदर्भात चर्चा करून पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे.

या बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, नियंत्रण समितीचे सदस्य, युवा आघाडी व महिला आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष व माजी आमदार मनोहर किनेकर, सरचिटणीस ॲड. एम. जी. पाटील, कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, उपाध्यक्ष रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मण होनगेकर, मोनाप्पा पाटील आणि विठ्ठल पाटील यांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

thirteen − 2 =

error: Content is protected !!