सीमाप्रश्नावर केलेल्या वक्तव्यांमुळे सीमाभागातील मराठी जनतेत संताप; जाहीर माफी मागून अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची मागणी
बेळगाव : पुण्यात होऊ घातलेल्या १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनियुक्त अध्यक्ष शरणकुमार लिंबाळे यांनी सीमाप्रश्न आणि मराठी भाषिकांच्या अस्मितेबाबत केलेल्या विधानांवरून सीमाभागातील मराठी जनतेत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यांच्या विधानांमुळे सीमाभागातील मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या असून, हा मराठी माणसाच्या आत्मसन्मानाचा अपमान असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
लिंबाळे यांनी “बेळगाव काय पाकिस्तानमध्ये आहे काय?” असा सवाल उपस्थित करत सीमाप्रश्नाबाबत केलेली टिप्पणी आणि ज्या प्रदेशात राहता तिथली संस्कृती व भाषा स्वीकारली पाहिजे, अशी मांडलेली भूमिका आक्षेपार्ह असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. भारतात आणि जगभरात मराठी माणूस राहतो म्हणून सर्व प्रदेश महाराष्ट्रात सामील करायचे काय, असा प्रश्न उपस्थित करून सीमाप्रश्नाची तुलना जगभरातील मराठी भाषिकांशी करणे म्हणजे या प्रश्नाचे गांभीर्य दुर्लक्षित करण्यासारखे असल्याचेही म्हटले आहे.
सीमाप्रश्न हा केवळ भाषेपुरता मर्यादित नसून तो भाषिक अस्मिता, लोकशाही मूल्ये, घटनात्मक अधिकार आणि सीमाभागातील मराठी जनतेच्या आत्मसन्मानाशी जोडलेला आहे. महाराष्ट्रात सामील होण्याची मागणी सीमाभागातील जनता कोणत्याही स्वार्थासाठी करत नसून त्यामागे सात दशकांचा संघर्ष, त्याग, आंदोलने आणि लोकशाही मार्गाने सुरू असलेला लढा आहे, असे ठामपणे मांडण्यात आले आहे.
साहित्य संमेलनाच्या इतिहासाची आठवण
१९४६ मध्ये बेळगाव येथे झालेल्या ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राचा ठराव संमत झाला होता. मराठी भाषिकांच्या एकीकरणाच्या चळवळीला साहित्यिक व्यासपीठावरून बळ मिळाले होते. त्यानंतर २००० सालच्या बेळगाव साहित्य संमेलनानेही सीमाप्रश्नाच्या लढ्याला नवी दिशा दिली. आजवर अनेक साहित्य संमेलनांमधून सीमाप्रश्नाच्या न्याय्य सोडवणुकीसाठी ठराव संमत करण्यात आले आहेत.
ज्या मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाने संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या विचाराला बळ दिले, त्याच साहित्य संमेलनाच्या शतकमहोत्सवी अध्यक्षपदी संयुक्त महाराष्ट्राच्या ऐतिहासिक भूमिकेशी विसंगत विचार मांडणाऱ्या व्यक्तीची निवड होणे दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त होत आहे.
साहित्यिकाने आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजाला जोडण्याचे आणि समाजातील जखमांवर फुंकर घालण्याचे काम करावे. मात्र, सीमाभागातील मराठी जनतेच्या प्रदीर्घ संघर्षाची अवहेलना करणारी विधाने करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. साहित्यिक स्वातंत्र्याच्या नावाखाली लाखो मराठी भाषिकांच्या भावनांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असेही ठणकावून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाकडे हस्तक्षेपाची मागणी
या संपूर्ण प्रकरणाची महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेने गांभीर्याने दखल घेऊन आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शरणकुमार लिंबाळे यांनी सीमाभागातील मराठी जनतेची जाहीर माफी मागावी आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणीही करण्यात आली आहे.
बेळगावातून व्यक्त झालेला हा निषेध महाराष्ट्रभर पोहोचवण्याची गरज असल्याचे सांगत, हा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधातील वैयक्तिक आकसाचा नसून मराठी अस्मिता, सीमाभागातील जनतेचा आत्मसन्मान आणि संयुक्त महाराष्ट्राच्या ऐतिहासिक भूमिकेच्या समर्थनाचा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
