मराठी माध्यमासाठी घोषित २०० जागांऐवजी केवळ ७८ जागांची अधिसूचना; बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याच्या वाट्याला ३९ जागा
बेळगाव : कर्नाटक सरकारच्या शिक्षक भरती प्रक्रियेत मराठी माध्यमासाठी घोषित करण्यात आलेल्या २०० जागांऐवजी केवळ ७८ जागांची अधिसूचना काढण्यात आल्याने मराठी भाषिक शिक्षक, शाळा आणि विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केला आहे. घोषित आश्वासनानुसार मराठी माध्यमाच्या किमान २०० शिक्षकांच्या जागा तातडीने भरण्यात याव्यात, अशी मागणी समितीने जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांच्या माध्यमातून शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
कर्नाटकात सध्या मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, भरतीच्या सुरुवातीच्या जाहिरातीत मराठी आणि उर्दू माध्यमांना स्थान देण्यात आले नव्हते. याविरोधात विविध संघटना, विद्यार्थी आणि शिक्षक उमेदवारांनी निवेदने व आंदोलने केल्यानंतर सरकारने उर्दू माध्यमासाठी ८०० आणि मराठी माध्यमासाठी २०० जागा भरण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, प्रत्यक्ष भरती प्रक्रियेत मराठी माध्यमासाठी केवळ ७८ जागांची अधिसूचना काढण्यात आली आहे. यामध्ये बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यासाठी ३९, चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यासाठी २६ आणि बिदर जिल्ह्यासाठी १३ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये ४९२ शिक्षकांची आवश्यकता असताना, आश्वासन दिलेल्या २०० जागाही पूर्णपणे भरती प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांची कमतरता कायम राहण्याची शक्यता समितीने व्यक्त केली.
या संदर्भात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांच्याशी सविस्तर चर्चा करून कर्नाटकचे शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांच्या नावे निवेदन सादर केले. जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी हा प्रश्न वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तातडीने मांडून पाठपुरावा करण्यात येईल आणि मराठी माध्यमाच्या जागा वाढविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
निवेदनात सरकारने पूर्वी घोषित केल्याप्रमाणे मराठी माध्यमासाठी २०० शिक्षकांच्या जागा तातडीने भरती प्रक्रियेत समाविष्ट कराव्यात, मराठी माध्यमाच्या शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करावा, अशी मागणी करण्यात आली. मागणीची दखल न घेतल्यास मराठी भाषिकांना तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, समिती नेते ॲड. अमर येळूरकर, आर. एम. चौगुले, माजी नगरसेवक सुनील बाळेकुंद्री, युवा समितीचे सरचिटणीस श्रीकांत कदम, उपाध्यक्ष वासू सामजी, राजू कदम, सिद्धार्थ चौगुले, सूर्याजी रावजी पाटील, संतोष कृष्णाचे, सूरज कुडूचकर, किरण मोदगेकर, किसन सुंठकर, आकाश भेकणे, प्रवीण कोराने आदी उपस्थित होते.
