गर्लगुंजी कबड्डी महासंग्रामात मराठा मंडळाच्या ताराराणी महाविद्यालयाचा मुलींचा संघ उपविजेता

गर्लगुंजी कबड्डी महासंग्रामात मराठा मंडळाच्या ताराराणी महाविद्यालयाचा मुलींचा संघ उपविजेता

दिव्या शिरोडकर ठरली उत्कृष्ट चढाईपटू; संघाला ८,५०० रुपये रोख आणि आकर्षक चषक

गर्लगुंजी (प्रतिनिधी) : न्यू मराठा संघ, गर्लगुंजी यांच्या वतीने १४ नोव्हेंबर रोजी आयोजित भव्य कबड्डी महासंग्राम स्पर्धेत मराठा मंडळाच्या ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या मुलींच्या कबड्डी संघाने दमदार कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. कित्तूर, नंदगड आणि रामदुर्ग येथील स्पर्धांमध्ये विजय मिळवल्यानंतर गर्लगुंजी येथेही संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या यशाबद्दल संघाला ८,५०० रुपये रोख पारितोषिक आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

गर्लगुंजी येथील या अटीतटीच्या स्पर्धेत ताराराणी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी अफाट ऊर्जा, जिद्द, कौशल्य आणि सांघिक एकजुटीच्या जोरावर मैदान गाजवले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामन्यात नंदिहळ्ळी संघाविरुद्ध, तर उपांत्य सामन्यात सांगली संघाविरुद्ध खेळताना ताराराणीच्या खेळाडूंनी आक्रमक खेळाचे दर्शन घडवले. संघाची कर्णधार दिव्या शिरोडकर हिने वेगवान आणि अचूक चढायांच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाच्या बचावफळीला आव्हान दिले. तिच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिला स्पर्धेतील ‘उत्कृष्ट चढाईपटू’ (Best Raider) या पुरस्काराने गौरविण्यात आले. मराठा मंडळाचे संचालक शिवाजी पाटील यांच्या हस्ते तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक राहुल जाधव उपस्थित होते.

दिव्या शिरोडकर हिला रेणुका गुरव हिने चांगली साथ दिली. आपल्या प्रभावी चढायांच्या माध्यमातून तिने बोनस आणि टच पॉइंट्स मिळवत संघाची धावसंख्या वाढविण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. चढाईसोबतच बचावामध्येही ताराराणीच्या खेळाडूंनी आपले कौशल्य सिद्ध केले. पल्लवी पाटील हिने उत्कृष्ट अँटी-रेड आणि चेन टॅकलच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी संघाच्या चढाईपटूंना रोखले. तिच्या अचूक वेळेच्या अंदाजामुळे आणि ताकदीच्या खेळामुळे संघाला महत्त्वाचे बचावात्मक गुण मिळाले.

या संघात कर्णधार दिव्या शिरोडकर (शिवठाण), पल्लवी पाटील (कुप्पटगिरी), रेणुका गुरव (गणेबैल), सृष्टी हंगिरकर (यडोगा), धनश्री भोसले (लालवाडी), श्रावणी पाटील (कुप्पटगिरी), कार्तिकी लोकलुचे (धामणे), लक्ष्मी गोरल (माडी-गुंजी) आणि आरती तोरगल (चापगाव) या खेळाडूंचा समावेश होता. सर्वच खेळाडूंनी शेवटपर्यंत जिद्दीने खेळत सांघिक एकजुटीचे दर्शन घडवले.

या यशामागे मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन, कबड्डी प्रशिक्षक प्रशांत पांखरे यांचे मार्गदर्शन तसेच भीमसेन आणि भरमाजी पाटील यांचे सहकार्य मोलाचे ठरले. प्राचार्य अरविंद पाटील, सर्व प्राध्यापकवर्ग आणि पालकांचेही खेळाडूंना प्रोत्साहन लाभले.

ताराराणी महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत असून, या उपविजेतेपदामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

15 + seven =

error: Content is protected !!