माणुसकीचे दर्शन; निराधारांच्या अखेरच्या प्रवासात टीमने दिला सन्मानाचा निरोप
बेळगाव : या जगात आपले म्हणावे असे कोणीही नसलेल्या आणि मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबीय किंवा नातेवाईक उपलब्ध नसलेल्या दोन व्यक्तींवर माजी महापौर विजय मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेत अंत्यसंस्कार केले. सदाशिवनगर स्मशानभूमीत दोघांनाही सन्मानपूर्वक अखेरचा निरोप देत टीमने माणुसकीचे दर्शन घडविले.
यातील पहिली व्यक्ती मध्यवर्ती बसस्थानक परिसरात वास्तव्यास असलेली एक व्यक्ती होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांना कोणीही कुटुंबीय किंवा नातेवाईक नसल्याने मार्केट पोलिसांनी माजी महापौर विजय मोरे यांच्याशी संपर्क साधून अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्याची विनंती केली.
दुसरी महिला मच्छे येथील निराश्रितांच्या परिहार केंद्रात वास्तव्यास होती. तिलाही उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे तिचे निधन झाले. तिच्या अंत्यसंस्कारासाठीही कोणी नातेवाईक उपलब्ध नसल्याने केंद्राच्या वतीने विजय मोरे आणि अवधूत तुडवेकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला.
दोन्ही घटनांची माहिती मिळताच विजय मोरे यांच्या नेतृत्वाखालील टीमने तत्काळ पुढाकार घेत दोघांच्याही अंत्यसंस्काराची व्यवस्था केली. सदाशिवनगर स्मशानभूमीत आवश्यक विधी पार पाडून दोघांनाही सन्मानपूर्वक अखेरचा निरोप देण्यात आला.
यावेळी अॅलन विजय मोरे, अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुले, प्रकाश मुचंडिकर, निशार शमशेर, संजय मेट्री, सदाशिवनगर स्मशानभूमीचे कर्मचारी तसेच मार्केट पोलीस ठाण्याच्या कर्मचारी सुजाता उपस्थित होत्या.
मृत्यूनंतरही प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने निरोप मिळणे हा तिचा मानवी हक्क आहे. कुटुंबीय आणि नातेवाईक नसल्यामुळे कोणालाही अखेरच्या प्रवासात एकटे सोडता कामा नये, याची जाणीव करून देणारा हा उपक्रम ठरला. दोन्ही निराधार व्यक्तींना सन्मानाने अखेरचा निरोप देत विजय मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माणुसकीचा आदर्श समाजासमोर ठेवला.
